पालिकेचे साहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन अडचणीत
By admin | Published: July 4, 2017 07:28 AM2017-07-04T07:28:34+5:302017-07-04T07:28:34+5:30
नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी के पूर्व विभागात साहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांच्यावर कठोर कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी के पूर्व विभागात साहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांच्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. याचे तीव्र पडसाद पालिकेच्या महासभेत सोमवारी उमटल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहेत. या चौकशीच्या अहवालानंतर त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
अंधेरी पूर्व विभागातील बांधकामांवर मनमानीपणे कारवाई सुरू असून विकासकामेही रखडली आहेत, असा आरोप करून जैन यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. निषेध म्हणून सभागृह तहकूबही करण्यात आले होते. जैन यांच्या विरोधात चौकशी करून आयुक्तांनी त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेशही महापौरांनी त्या वेळी दिले होते. त्यानुसार सोमवारी झालेल्या महासभेत हा विषय पुन्हा चर्चेसाठी आला. यावर उत्तर देताना आयुक्त अजय मेहता यांनी सरकारी सेवेत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांविरोधात काळ्या फिती लावून भाषणे करणे, आंदोलन करणे उचित नाही, असे कबूल केले. लोकप्रतिनिधींचा आदर करायलाच हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. या मुद्द्यांवर अधिकारी, संबंधित नगरसेवक यांच्याशी लवकरच बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र नेमक्या कोणत्या तक्रारीवरून ही परिस्थिती निर्माण झाली, याचा शोध घेतला जाणार आहे.