मुंबई - सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर ६ मार्च २०२३ रोजी प्राणघातक हल्ला घडला होता. पीडित मुलगी अल्पवयीन असून, तिच्यावर ५ मार्च रोजी दोघांनी अत्याचार केला होता. त्यानंतर मुलीने त्यांच्याविरोधात ५ मार्च रोजी बार्शी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपींना अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती. हे प्रकरण शिवसेना आमदार सचिन अहेर यांनी विधानपरिषदेत उपस्थित केल्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे.
बार्शीतील या पीडित अल्पवयीन मुलीवरील हल्लाप्रकरणात तपास करताना पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली. याप्रकरणी ४ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, हे प्रकरण अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोहोचल्यानंतर आता संजय राऊत यांनी ट्विट करुन पीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतील फोटोच शेअर केला.
देवेंद्रजी, हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे, गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला, आरोपी मोकाट आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देऊ केल्याप्रकरणी आरोपी मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यावरुन कारवाई होत असताना आता राऊत यांनी बार्शीतील पीडित मुलीसंदर्भातील प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी पीडित मुलीने परीक्षेवेळी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार दिली म्हणून आरोपीने या मुलीची बोटं छाटली. याशिवाय अल्पवयीन मुलीच्या कपाळावर अन् डोक्यावर सत्तूरने वारही केला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून पीडित अल्पवयीन मुलीवर खुनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणात कर्तव्यात कसूर व गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न केल्याप्रकरणी बार्शीच्या शहर पोलिस ठाण्यातील एका सहायक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस उपनिरीक्षक, एक हेडकॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले होते.