Join us

"देवेंद्रजी, सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 5:18 PM

कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपा सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला. तसेच सावरकरांचा धडाही अभ्यासक्रमातून वगळला

मुंबई  - शिवसेना फुटीनंतर भाजपा आणि ठाकरे गटातील वाद अधिकच वाढत आहे. आधी काँग्रेसोबतची युती, हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजपाकडून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत होते. आता, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भातील काँग्रेसच्या भूमिकेवर लक्ष्य केलं जात आहे. आता कर्नाटक राज्यात सत्तांतर होताच काँग्रेस सरकारने भाजप सरकारने घेतलेले काही निर्णय फिरवण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरुनच, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंना सवाल केला. त्यानंतर, शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे.  

कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपा सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला. तसेच सावरकरांचा धडाही अभ्यासक्रमातून वगळला. यावरून भाजप आक्रमक झाली असून, महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव येथील जाहीर सभेत कर्नाटकातील निर्णयांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना सवाल केला. तसेच, सावरकरांचा नामोल्लेख करत शिवसेनेवर टीकाही केली. त्यावरुन, अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारलं आहे.

देवेंद्रजी, आम्हाला कसला पॅटर्न विचारता? देशभरातील अर्धा डझन राज्यांचे सरकारं मागच्या दाराने पाडण्याचा पॅटर्न तुमच्याच पक्षाने आणला आहे. सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा आता, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी फडणवीसांवर पलटवार केला. तसेच, एवढेच सावरकर प्रेम असेल तर तुमची महाशक्ती आणि पातशाह सावरकरांना भारतरत्न कधी देणार आहेत, हे पण सांगुन टाका!, असे आव्हानही दानवे यांनी फडणवीसांना दिले. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस   

माझा महाविकासआघाडीला सवाल आहे की, ते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हणत आहेत तो हाच आहे का? आता उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय आहे? त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. ते ज्यांच्या मांडिला मांडी लावून बसले ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव पुसायला निघाले आहेत. ते धर्मांतरणाला पाठिंबा देत आहेत. आता उद्धव ठाकरेंचे मत काय हे त्यांनी सांगावे. यावरून उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी ही तडजोड केली हे स्पष्ट होते. मला असे वाटते की, असे निर्णय घेऊन त्यांना कुणाचेही नाव जनतेच्या मानसपटलावरून पुसता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, सावरकरांना अभ्यासक्रमातून वगळू शकता, मात्र ते लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत. ते लोकांच्या मनातून एकही स्वातंत्र्यसंग्रामी काढू शकत नाही. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळे काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करण्यासाठी कर्नाटकचे सरकार निर्णय घेत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपाविनायक दामोदर सावरकर