मुंबई - राज्यात सत्तापरिवर्तनाची हालचाल खऱ्या अर्थाने राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांवेळीच सुरू झाली होती. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा झालेला पराभव अनेक आमदारांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे, विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात शिवसेनेतील मोठा गट विभक्त झाला आणि राज्यात सत्तांतर घडून आलं. या सत्तांतराचे किंगमेकर हे भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले, तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री बनले. त्यानंतर, भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. त्यामुळे, फडणवीस यांनी भावनिक पोस्ट लिहून मुक्ता टिळक यांचे आभार मानले आहेत.
राज्याला प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पाचवी जागा जिंकत महाविकास आघाडीवर मात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा राज्यसभेप्रमाणेच तेथेही दिसला. महाविकास आघाडीला पाच जागा मिळाल्या, पण सहावी जागा गमवावी लागल्याने मोठा धक्का बसला. या निवडणुकीत काँग्रेसचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला.
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी दोन्हीवेळेस रुग्णावाहिकेतून विधिमंडळ गाठत भाजपला मतदान केले. त्यामुळे, भाजप नेत्यांकडून त्यांच्या पक्षप्रेमाचे आणि कर्तव्याचे उदाहरण सातत्याने दिले गेले. तसेच, हा विजयही त्यांनाच समर्पित करण्यात आला. आता, राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही मुक्ता टिळक यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. सद्यस्थितीतही आजारी असताना त्यांनी ही आपुलकी आणि कर्तव्य निभावल्याने देवेंद्र फडणवीसही भावूक झाल्याचं त्यांच्या ट्विटमधून पाहायला मिळत आहे.