Coronavirus Outbreak! देवाचिये द्वारी, राहा मास्कधारी; दर्शनासाठी येताना मास्क लावण्याचे भक्तांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 05:40 AM2022-12-25T05:40:25+5:302022-12-25T05:41:09+5:30
Coronavirus Outbreak: मुंबादेवी आणि सिद्धिविनायक या दोन मंदिरांच्या प्रशासनांनी भाविकांना दर्शनासाठी येताना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने उचल खाल्ली असल्याने खबरदारी म्हणून देशभर कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले जाऊ लागले आहे. त्याचवेळी नाताळ आणि वर्षअखेर या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबादेवी आणि सिद्धिविनायक या दोन मंदिरांच्या प्रशासनांनी भाविकांना दर्शनासाठी येताना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे.
मुंबादेवी मंदिर व्यवस्थापनाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. विशेषतः सुरक्षारक्षकांना मास्कसह हातमोजे वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. चीनमधील कोरोना उद्रेकानंतर मुंबादेवी मंदिर व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात कायम भक्तांचा राबता असतो. मंदिरात तत्काळ कोरोनाविषयक नियमांची सक्ती करण्यात आली नसली, तरी नागरिकांना स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मास्कचा वापर करावा तसेच अन्य कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने केले आहे.
विमानतळावर २% प्रवाशांची कोरोना चाचणी
परदेशातून मुंबईत येणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी २ टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार ही तपासणी होणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार, प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी मुंबई विमानतळावर विशेष केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्रे इमिग्रेशनच्या आधीच उभारण्यात आली असून ती २४ तास सुरू राहणार आहेत. प्रवासी ज्या विमानाने येतील त्या विमानातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रवाशांची चाचणी होणार आहे. अशा प्रवाशांकडून कोरोना चाचणीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. या चाचणीकरिता विमानतळावर एकूण ६ नोंदणी कक्ष व ३ चाचणी कक्ष उभारण्यात आले आहेत. येथे चाचणी झाल्यानंतर प्रवासी पुढे मार्गस्थ होऊ शकतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"