मुंबई : राज्यभरात ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जवळच्या आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्यांच्या सेवेसाठी एसटी तत्पर असून, यात्रा काळात ५ हजार विशेष बस धावणार आहेत.
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजनांसह शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.
यंदा बस चिखलात अडकणार नाही...
यंदा पावसाची शक्यता गृहीत धरून प्रवाशांना यात्रा बसस्थानकात पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
मुख्य म्हणजे यंदा बस चिखलात अडकून पडणार नाहीत, याची काळजी घेत बसेसची पार्किंग केली जाणार आहे. एसटीमुळे वाहतूककोंडी होणार नाही याची विशेषत: दक्षता घेतली जाणार आहे.
जादा वाहतुकीसाठी येणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकारी यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.