मिलिंद अष्टीवकर, रोहाशहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसोबतच अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात असलेली श्री दत्त सांप्रदायिक मंडळ, शहरासह गावोगावची दत्त मंदिरे यासह श्री स्वामी समर्थ मठातील सेवेकरी आणि सांप्रदायिक यांच्या अनुष्ठानामध्ये दत्त दिगंबराचे स्थान मोठे आहे. दत्तगुरूंवर भाविकांची असलेली अपार माया आणि श्रध्देचे प्रतीक म्हणून या उत्सव सोहळ्याला वेगळे महत्त्व मिळालेले आहे. गुरू परंपरेला मानणाऱ्या विविध धर्म, संप्रदायांचे मठ आणि दत्त मंदिरात शुक्रवारी सायंकाळी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जन्मोत्सवाला मोठ्या उत्साहाने सुरूवात झाली आहे. रोहा शहर आणि परिसरातील अनेक ठिकाणच्या दत्त मंदिरात दत्तजयंतीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, सत्यनारायणाची महापूजा यासह सांस्कृतिक उपक्रमांचीही रेलचेल असल्याने आज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गुरूदेव दत्तात्रयाच्या नामजपाने सर्वत्र भक्तिमय वातावरण राहणार आहे. रोहा शहरातील काळे यांचे दत्त मंदिर, कुंटे यांचे विष्णू मंदिर, हनुमान नगर येथील दत्त मंदिर, भुवनेश्वर येथील दत्त मंदिरात शुक्रवारपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरूवात झाली.
दत्त जन्मोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण
By admin | Published: December 05, 2014 11:02 PM