मुंबई : दक्षिण मुंबईतील पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोअर परेल येथील श्री संत मोरे माऊली स्मारक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या आनंदात साजरा झाला. पहाटे श्रींना अभिषेक, पूजाअर्चा व काकड आरती करण्यात आली. त्यानंतर परिसरातील वारकरी व भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे शिस्तबद्ध रांगेत दर्शन घेतले.
सर्व भाविकांनी सकाळी ह.भ.प. दिनकरमहाराज सावंत, गोविंदमहाराज मोरे, उद्धव कुमठेकर, मृदुंगवादक अंकेश चव्हाण आणि मंडळींच्या वारकरी संप्रदायिक भजनाचा आनंद लुटला. दुपारी रेखावहीनी मोरे, लीना मोरे, सुरेखा कदम, संगीता सुर्वे, मृदुंगवादक विलास जाधव, हरिश्चंद्रमहाराज जाधव आणि मंडळींनी श्री संत मोरे माऊली महिला मंडळाचे भजन संप्रदायिक भजन सादर केले. सायंकाळी सुधा केळकर व मंजिरी केळकर यांनी भक्तीगीतांचा सुरेल कार्यक्रम सादर करत फुगड्यांचा डाव मांडला.
सायंकाळी श्रींच्या आरतीपूर्वी ह.भ.प. अंकुशमहाराज कुमठेकर, महादेवमहाराज जाधव, अरुणमहाराज जाधव आणि मंडळींनी श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ केला. रात्री ह.भ.प.कृष्णामहाराज मोरे यांचे 'आषाढी एकादशीनिमित्त आषाढी कार्तिकी हेचि आम्हा सुगी' या अभंगावर सुश्राव्य किर्तन झाले. श्री पांडुरंगाच्या उत्सवासाठी मोरे माऊली स्मारक सेवा समितीचे सचिव लहूमहाराज मोरे, विणेकरी सिताराममहाराज जाधव, हरिश्चंद्रमहाराज जाधव, महेंद्र सुर्वे, विलास जाधव रवींद्र पवार, सीताराम मोरे आणि सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.