जागतिक पर्यावरण दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील हिरवळ कमी होत असतानाच, दुसरीकडे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आरेमध्ये परिसंस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी झाडांची लागवड करत देवराई उभी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम जरी १० टक्केच असले, तरी केवळ देवराई निर्माण करणे हा या कामामागचा उद्देश नाही, तर निसर्गाप्रती प्रेम, आदर, आपुलकी आणि आपल्या पुढील पिढ्यांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा वारसा पोहोचविणे हा मूळ हेतू आहे.
एक एकरमध्ये ८० प्रजातींच्या देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे. येथील पर्यावरण संवर्धनासाठी दोन हजार सालापासून याची सुरुवात झाली. पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेले संदीप आठल्ये यांचे वडील विनय आठल्ये यांनी येथे झाडे लावण्याचे काम हाती घेतले. दोन हजार सालापासून २०१५ पर्यंत आरेमध्ये साडे चार ते पाच हजार झाडे लावण्यात आली. २०१५ साली विनय आठल्ये यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी फुलपाखरू उद्याने तयार करण्यात आले. आज फुलपाखरू उद्यानात ८० प्रजातींची फुलपाखरे आहेत. याच काळात आरेमध्ये जंगली झाडांचीही लागवड करण्यात आली. २०१५ पासून आतापर्यंत फुलपाखरू उद्यानात हजार ते दीड हजार छोटी झाडे लावण्यात आली. पाच वर्षांत पाचशे मोठी जंगली झाडे लावली. अशी आरेत एकूण सहा ते साडे हजार झाडे लावण्यात आली. भविष्यात खूप जास्त ऑक्सिजन देणारी दोनशे झाडे लावली जाणार आहेत.
..............................
................................
आरेसाठी आम्ही सारे...
आरेमध्ये परिसंस्थाचे संवर्धन करण्यासाठी संदीप आठल्ये यांचे वडील विनय आठल्ये यांनी सुरुवात केली. आता स्वत: संदीप हे पर्यावरण संवर्धनासाठी काम करत आहेत. या कामी त्यांची आई आरती आठल्ये, त्यांचा मुलगा मल्हार आठल्ये, पत्नी वरदा आठल्ये मदत करत आहे. या व्यतिरिक्त देवराईसाठी आठल्ये यांना संध्या ओक यांनी मदत केली. सुभाष वाघ, प्रसाद देसाई, शशांक कामत यांचीही या कामी मदत होत आहे.