Join us

डीजी रश्मी शुक्लाही केंद्रात प्रतिनियुक्तीवर! केंद्रीय राखीव दलाच्या अप्पर महासंचालक : दीड महिन्यात २ डीजींनी सोडला महाराष्ट्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:07 AM

गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्र पोलीस दलातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या शुक्ला या दुसऱ्या अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकारी आहेत. गतवर्षाच्या अखेरीस तत्कालीन ...

गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्र पोलीस दलातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या शुक्ला या दुसऱ्या अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकारी आहेत. गतवर्षाच्या अखेरीस तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) प्रमुख म्हणून निवड झाली आहे.

रश्मी शुक्ला या १९८८ च्या आयपीएस बॅचच्या अधिकारी आहेत. राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी त्यांची पदोन्नतीवर नागरी संरक्षण विभागात बदली केली होती. त्यांच्यासाठी गृहरक्षक दलाशी संलग्न असलेला विभाग स्वतंत्र केला होता. मात्र तुलनेत कमी महत्त्वाचे पद असल्याने त्यांना त्याठिकाणी काम करण्यात फारसे स्वारस्य नव्हते. त्यामुळे त्यांनी निवृत्तीपर्यंत म्हणजे ३० जून २०२४ पर्यंत प्रतिनियुक्तीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यापूर्वी पुणे पोलीस आयुक्त तसेच राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त, सहआयुक्त म्हणून अनेक वर्षे काम पाहिले आहे.

दरम्यान, रश्मी शुक्ला या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी समजल्या जातात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने त्यांना ‘साईड पोस्टिंग’ दिली होती. सरकारशी त्याचे फारसे पटत नसल्याने त्यांनीही जायसवाल यांच्याप्रमाणे केंद्रात जाण्याला प्राधान्य दिले. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातून एक दर्जा कमी असलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) हे पद स्वीकारल्याचे सूत्रांनी सांगितले.

........................