केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी डीजी रश्मी शुक्ला कार्यमुक्त, संजय पांडेय यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 02:57 AM2021-02-16T02:57:03+5:302021-02-16T07:04:11+5:30
DG Rashmi Shukla retires for Central Deputation : १९८८च्या आयपीएस बॅचच्या अधिकारी असलेल्या शुक्ला यांची पाच महिन्यांपूर्वी पदोन्नतीवर नागरी संरक्षण विभागात बदली केली होती.
मुंबई : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अपर महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झालेल्या महासंचालक रश्मी शुक्ला यांना सोमवारी कार्यमुक्त करण्यात आले. त्यांचा नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स) विभागाचा अतिरिक्त कार्यभार ज्येष्ठ महासंचालक (होमगार्ड) संजय पांडेय यांच्याकडे देण्यात आला.
गेल्या ८ फेब्रुवारीला शुक्ला यांची केंद्रीय गृह विभागाने प्रतिनियुक्तीचे आदेश काढले होते. १९८८च्या आयपीएस बॅचच्या अधिकारी असलेल्या शुक्ला यांची पाच महिन्यांपूर्वी पदोन्नतीवर नागरी संरक्षण विभागात बदली केली होती. त्यांच्यासाठी गृहरक्षक दलाशी संलग्न असलेला विभाग स्वतंत्र केला होता. मात्र, राज्य सरकारची अवकृपा असल्याने त्यांनी निवृत्तीपर्यंत म्हणजे ३० जून २०२४ पर्यंत प्रतिनियुक्तीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा पदभार राज्यातील सर्वांत ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडेय यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
गेल्या ५ वर्षांपासून अधिक काळ होमगार्डमध्ये कार्यरत पांडेय यांच्याकडे गेल्या २ महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचाही अतिरिक्त कार्यभार आहे.