अमोल यादवच्या विमान उड्डाणाला डीजीसीएची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 03:08 AM2019-10-20T03:08:50+5:302019-10-20T03:08:54+5:30
स्वत: निर्मिती केलेल्या व गेल्या काही वर्षांपासून विमान उड्डाणाच्या परवानगीसाठी प्रयत्नशील असलेल्या कॅप्टन अमोल यादव यांना विमान उड्डाणाची परवानगी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे (डीजीसीए) देण्यात आली.
मुंबई : स्वत: निर्मिती केलेल्या व गेल्या काही वर्षांपासून विमान उड्डाणाच्या परवानगीसाठी प्रयत्नशील असलेल्या कॅप्टन अमोल यादव यांना विमान उड्डाणाची परवानगी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे (डीजीसीए) देण्यात आली.
यादव यांनी डीजीसीएकडून १४ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या विमानाचे उड्डाण करता येईल. महिन्याभरात किंवा जास्तीतजास्त दोन महिन्यांत या विमानाचे यशस्वी उड्डाण होईल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला. यादव यांनी तयार केलेल्या सहा आसनी विमानाला १० तासांचे उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
यादव यांनी तयार केलेल्या या विमानाच्या उड्डाणाला डीजीसीएने काही अटींवर विशेष परवानगी दिली आहे. ‘मेक इन इंडिया’मध्ये २०१६ मध्ये यादव यांचे विमान सर्वप्रथम समोर आले होते. सध्या त्यांचे विमान धुळे येथे पार्क केले आहे. परवानगी मिळाल्यामुळे आकाशात उड्डाण करण्याचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येईल, असे यादव यांनी सांगितले.