चिपी विमानतळाच्या धावपट्टीबाबत 'डीजीसीए' असमाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:06 AM2021-03-08T04:06:14+5:302021-03-08T04:06:14+5:30
‘आयआरबी’कडून निर्देशांचे पालन नाही; विमान उड्डाणास होणार आणखी विलंब सुहास शेलार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चिपी विमानतळाच्या धावपट्टीत ...
‘आयआरबी’कडून निर्देशांचे पालन नाही; विमान उड्डाणास होणार आणखी विलंब
सुहास शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चिपी विमानतळाच्या धावपट्टीत सुधारणा करण्याबाबत सूचना देऊनही ‘आयआरबी’ने त्यांची पूर्तता न केल्याने नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नाराजी व्यक्त केली. या विमानतळाची धावपट्टी प्रवासी विमान वाहतुकीसाठी परिपूर्ण नसल्याचे मत डीजीसीएच्या पथकाने आपल्या अहवालातून व्यक्त केले. त्यामुळे या विमानतळाचा मुहूर्त लांबणीवर पडेल.
डीजीसीएच्या पथकाने नुकतीच चिपी विमानतळाची पाहणी केली. या विमानतळाची धावपट्टी मोठ्या विमानांच्या वाहतुकीसाठी परिपूर्ण नसल्याकडे या पथकातील सदस्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे एअर बस किंवा बोईंग या प्रकारातली विमाने या धावपट्टीवरून हाताळणे धोकादायक असल्याचे मत या पथकाने व्यक्त केले. परिणामी, जोपर्यंत डीजीसीएच्या निर्देशांनुसार धावपट्टीचे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतुकीस हिरवा कंदील मिळणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आयआरबी या कंपनीला चिपी विमातळ उभारणीचे काम देण्यात आले. ते पूर्ण झाले असून, वाहतूक सुरू करण्यासाठी डीजीसीएच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. परंतु, डीजीसीएच्या पथकाने धावपट्टीवरच आक्षेप घेतल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. आयआरबीने तात्काळ या धावपट्टीचे काम पूर्ण न केल्यास त्यांच्यासोबतचा करार रद्द करून महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे पुढील काम देण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. येत्या ९ मार्च रोजी नवी दिल्ली येथे आयआरबीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
* करार रद्द करण्याची मागणी
चिपी विमानतळाच्या धावपट्टीच्या गुणवत्तेबाबत डीजीसीएचे पथक असमाधानी आहे. या पथकाने काढलेल्या त्रुटींचा अहवाल अद्याप आरआरबीकडे पोहोचलेला नाही. परंतु, आयआरबीने धावपट्टीच्या कामात आणखी चालढकल केल्यास त्यांच्या सोबतचा करार रद्द करून महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडे या विमानतळाचा ताबा देण्याची मागणी आम्ही लावून धरणार आहोत.
- विनायक राऊत,
खासदार (शिवसेना)
...............................