वाढत्या विमान तिकीट दरांना डीजीसीए लावणार चाप?; प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 05:38 AM2024-02-13T05:38:19+5:302024-02-13T05:38:46+5:30
मात्र, तज्ज्ञ म्हणतात... डीसीजीएच्या कारवाईचा उपयोग नाही
मुंबई : गेल्या काही महिन्यांत विमान तिकिटांच्या दरात झालेल्या भरमसाठ वाढीची केंद्र सरकारने दखल घेत यासंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) हस्तक्षेप करण्याची सूचना केली आहे. मात्र, सध्या देशातील विमानांची असलेली कमतरता, वाढलेले हवाई मार्ग व वाढलेली प्रवाशांची संख्या यांमुळे डीजीसीएही यामध्ये फारसा हस्तक्षेप करू शकणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात असलेल्या एकूण ७५० विमानांपैकी २०० विमाने सध्या तांत्रिक दोषांमुळे जमिनीवरच स्थिरावली आहेत. त्यामुळे विमानांच्या संख्येत लक्षणीय कपात झाली आहे. त्यातच गेल्या दहा वर्षांत नवीन ७५ विमानतळे सुरू झाल्यामुळे हवाई मार्गांवरील जोडणी वाढली आहे. परिणामी, वेळेच्या बचतीसाठी अनेक लोक विमानसेवेचा अवलंब करत आहेत.
गेल्यावर्षी दिवाळी, नाताळ व नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये देशातील अनेक मार्गांवरील विशेषतः पर्यटन मार्गांवरील विमान प्रवासाच्या दरांनी किमान २० ते ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात विमान प्रवासाचे दर आटोक्यात आणण्यासाठी डीजीसीएने हस्तक्षेप करण्याची सूचना करण्यात आली आहे. २०२४ मध्ये भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात आणखी १५० नवी विमाने दाखल होण्याची अपेक्षा आहे. मात्र, वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता ही विमाने अपुरी असून विमान प्रवासाचे दर चढेच राहतील, असा अंदाज आहे.