Join us

‘त्या’ घटनेची डीजीसीए करणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खराब हवामानामुळे (एअर टर्ब्युलन्स) हेलकावे खाल्लेल्या एअर विस्ताराच्या विमानातील आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खराब हवामानामुळे (एअर टर्ब्युलन्स) हेलकावे खाल्लेल्या एअर विस्ताराच्या विमानातील आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. नागरी उड्डाण संचालनालयाने (डीजीसीए) याची गंभीर दखल घेतली असून, संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार आहे.

मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या एअर विस्ताराच्या बोइंग ७३७ (युके ७७५) या विमानात हा प्रकार घडला. जखमींपैकी तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न डीजीसीए करणार आहे. विमानातील कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर डाऊनलोड करण्यात आला असून, त्याचा बारकाईने अभ्यास करण्यात येईल. या माध्यमातून संपूर्ण घटनाक्रम समोर येऊ शकतो. डीजीसीएचे संचालक अरुण कुमार यांच्या सूचनेनुसार ही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विमान उड्डाण करीत असताना, अचानक हवेचा दाब कमी-अधिक झाल्यास एअर टर्ब्युलन्स होतो. अशा वेळी विमान जवळपास १०० फूट वर-खाली होऊन हेलकावे खाते. त्यामुळे आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण होत असली, तरी प्रवाशांना गंभीर स्वरूपाची इजा होण्याचे प्रकार फार कमी वेळा घडतात. मात्र, एअर विस्ताराच्या विमानातील जखमी झालेल्या आठ प्रवाशांपैकी तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे एअर टर्ब्युलन्सच्या वेळी विमानात नक्की काय घडले, याचा शाेध डीजीसीआय घेणार आहे.

....................................................