लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व होमगार्डचे महासमादेशक परमबीर सिंग यांनी निरीक्षक अनुप डांगे यांच्यावर जाणीवपूर्वक खोटी कारवाई केल्याने तसेच त्यांना पैशांसाठी धमकविल्याप्रकरणाची चौकशी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी डांगे हे गावदेवी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी एका बारवर छापा टाकला होता. त्यावेळी बारमालकाने आपण एसीबीत कार्यरत परमबीर सिंग यांच्याशी संबंधित असल्याचे सांगत आपल्यावर दबाव आणल्याची डांगे यांची तक्रार आहे. त्यानंतर परमबीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्तपदी आल्यावर अनुप डांगे यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर एकाने आपण आयुक्तांचा नातेवाईक असल्याचे सांगून पुन्हा सेवेत घेण्यासाठी दोन कोटींची मागणी केली होती. त्याचबरोबर परमबीर यांचे काही गुंडांशी संबध असल्याचा आरोप डांगे यांनी मुख्यमंत्री, गृह सचिवांकडे पत्र पाठवून केला होता. या प्रकरणाचा तपास आता पांडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
डांगे यांना पुन्हा गावदेवी पोलीस ठाण्यात रुजू करण्यात आले आहे.