जमीर काझीमुंबई : पोलीस दलात कार्यरत असताना केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिले जाणारे सन्मानचिन्ह मिळालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे ओळखपत्र देण्याचा निर्णय गेल्या चार वर्षांपासून कागदावरच बारगळला आहे. इतकेच नव्हे तर संबंधित अधिकाºयांची माहितीच पोलीस मुख्यालयात अद्याप उपलब्ध झालेली नाही.
महासंचालक कार्यालय त्याबाबत आता जागे झाले आहे. सन्मानचिन्ह प्राप्त असलेल्यांची माहिती पाठविण्याची सूचना राज्यातील सर्व घटकप्रमुखांना केली आहे. चार वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पोलीस कर्मचारीवृंद परिषदेच्या ४९ व्या सभेमध्ये इनसिग्निया मिळालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या सन्मानार्थ ‘डीजी’चे स्वतंत्र ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे संबंधित अधिकाºयांना कसलेही विशेष अधिकार मिळणार नसले तरी त्यांच्यासाठी ते संस्मरणीय असावे, हा त्यामगील उद्देश होता. मात्र मुख्यालयातील प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे त्याचे सगळ्यांनाच विस्मरण झाले. त्याबाबत काहीच कार्यवाही करण्यात आली नसल्याने महासंचालकांचे ओळखपत्र देण्याचा निर्णय कागदावरच राहिला आहे. संबंधित अधिकाºयांकडून त्याबाबत नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर मुख्यालयाला जाग आली आहे. त्यामुळे २०१५ पूर्वी सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या अधिकारी, अंमलदारांची यादी तातडीने जमा करण्याचे आदेश पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिले आहेत. त्यासाठी प्रत्येक आयुक्त, अधीक्षक व घटकप्रमुखांना आपापल्या अखत्यारीत कार्यक्षेत्रातील संबंधितांची यादी बनविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्याकडून विहित नमुन्यातील अर्जात पाठविलेल्या यादीनुसार मुख्यालयाकडून ओळखपत्रे बनवून पाठविण्यात येतील.निवृत्त पोलिसांचे शोध घेण्याचे आव्हानपोलीस दलातील २०१५ पूर्वी इनसिग्निया मिळालेल्यांपैकी अनेक अधिकारी, अंमलदार सेवानिवृत्त झाले आहेत. काही जणांचे निधन झाले आहे; तर काही जण रिटायर झालेल्या ठिकाणापासून मूळ गावी किंवा त्यांना सोयीच्या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन त्यांना ओळखपत्र वितरित करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. खात्याकडून त्यासाठी खरोखर कितपत प्रयत्न केले जातील, हा औत्सुक्याचा विषय बनून राहणार आहे.