कोरोनाच्या पार्श्वभूमीची खबरदारी : सर्व ड वर्ग कर्मचाऱ्यांना एकाच शिफ्टमध्ये ड्यूटी
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा पादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस महासंचालकांनी कार्यालयात कर्मचाऱ्यांना ५० टक्के हजेरी लावण्याचे आदेश दिले असताना पोलीस मुख्यालयात त्याची पायमल्ली करण्यात आली आहे. महासंचालकांच्या उपसहायकांनी ड क्षेणीतील सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळेत (शिप्ट) कामावर हजर राहण्याचे फर्मान सोडले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कार्यालयीन ड्यूटीची सक्ती करण्यात आल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे.
मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना कोरोनाचे निर्बंध पाळत कार्यालयात कर्मचाऱ्यांची हजेरी निम्यावर आणणे, त्यांना दोन शिप्टमध्ये ड्यूटी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २३ फेब्रुवारीला पोलीस अपर महासंचालक (प्रशासन) संजीव सिंघल यांनी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत पोलीस महासंचालकांच्या वतीने आदेश बजाविले. त्यात अ व ब संवर्गातील अधिकाऱ्यांना १०० टक्के, तर क व ड संवर्गातील एकूण कर्मचाऱ्यांना कार्यालयात ५० टक्के हजेरी लावावी, उर्वरितांपैकी २५ टक्के कर्मचारी सकाळी ९ ते दुपारी ४ व अन्य २५ टक्के कर्मचाऱ्यांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत ड्यूटी देण्याची सूचना केली होती. त्यांच्या आदेशाला तीन दिवसांत महासंचालकांचे उपसहायक लेन्सी कोयलो यांनी महासंचालकांकरिता ड वर्ग कर्मचाऱ्यांबाबत स्वतंत्र आदेश काढून पूर्वीच्या आदेशावर पाणी फेरले आहे. मुख्यालयातील सर्व १५ कर्मचाऱ्यांना त्यांनी कार्यालयात हजेरी लावण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर सर्वांना एकाच शिप्ट म्हणजे सकाळी ९.३० ते ४.३० यावेळेत संबंधित ठिकाणी कर्तव्यावर हजर राहावे लागणार आहे.