ढाक्कुमाकुमची धाकधूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:19 AM2017-08-01T03:19:00+5:302017-08-01T09:41:31+5:30
वीस फूट उंचीसह गोविंदाचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे, या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने गोविंदा हिरमुसला आहे.
- अक्षय चोरगे
मुंबई : वीस फूट उंचीसह गोविंदाचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे, या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने गोविंदा हिरमुसला आहे. सण व संस्कृती जपण्याच्या सबबीखाली आयोजकांनी सरकारला हे नियम शिथिल करण्यासाठी साकडे घातले आहे. मात्र सध्यातरी सरकारच्या हाती काहीच नसल्याने सरकारनेही नियमांत बदल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी आहे. या सुनावणीत न्यायालय राज्य सरकारच्या बाजूने कौल देणार का? की घातलेले निर्बंध कायम ठेवणार? असे अनेक विचार सध्या गोविंदांच्या व आयोजकांच्या मनात येत आहेत. परिणामी, या सुनावणीत नक्की काय होणार? याकडे गोविंदा पथकांसह सर्वच मुंबईकरांचे लक्ष लागले असून, यामुळे ‘ढाक्कुमाकुमची धाकधुक’ वाढली आहे.
१ आॅगस्ट रोजी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, या वेळी गोविंदांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करणार; याबाबत राज्य शासन लेखी अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच सरावाला कमी प्रतिसाद मिळत आहे. आपल्या बाजूने निकाल लागेल का, असा प्रश्न गोविंदांना पडला आहे. निर्बंध हटविण्यात आले तर दहीहंडीचा सराव करणाºया गोविंदांची संख्या वाढेल, अशी आशा दहीहंडी पथकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांत आयोजकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कित्येक आयोजकांनी दहीहंडीसाठी लावलेल्या बक्षीस रकमेतही कपात केली आहे.
गुरुपौर्णिमेपासून गोविंदांनी मनोरे उभे करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्वच गोविंदांना असे वाटत आहे की, निर्बंध उठविले जातील. तसे झाल्यास गोविंदांचा उत्साह वाढेल. गोविंदांच्या सुरक्षेबाबत शासन लेखी भूमिका मांडेल. आपणही त्यास सहकार्य करणे गरजेचे आहे. समितीच्या पुढील उपक्रमांची दिशा न्यायालयाच्या निर्णयानंतर ठरविण्यात येईल, असे दहीहंडी समन्वय समितीकडून सांगण्यात आले.
सध्या शहरात गोविंदा आणि दहीहंडी पथके दहीहंडीचा सराव करण्यात व्यस्त आहेत. गुरुपौर्णिमेपासून दहीहंडीच्या सरावाची तयारी सुरू झाली आहे. पण यंदा दहीहंडीला नोटाबंदीचा फटकासुद्धा बसण्याची शक्यता आहे, असे मतही गोविंदा पथकांकडून व्यक्त केले जात आहे. तर सरावाच्या वेळी जितके थर लावता तितकेच थर दहीहंडीच्या दिवशी लावा. त्याहून अधिक थर लावण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन गोविंदा आणि गोविंदा पथकांना करण्यात येत आहे.