पुन्हा मुंडे vs मुंडे; पंकजांनी 106 कोंटींचा मोबाईल घोटाळा केल्याचा धनंजय यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 12:40 PM2019-03-07T12:40:35+5:302019-03-07T12:41:30+5:30
पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, आता मोबाईल खरेदी प्रकरणातही भ्रष्टाचार केल्याचा आरोप
मुंबई - ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. पंकजा यांनी अंगणवाडी सेविकांच्या केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या स्मार्टफोन मोबाईलमध्ये 106 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडें यांनी केला आहे. त्यामुळे चिक्की घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा पंकजा यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप लागले आहेत.
पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, आता मोबाईल खरेदी प्रकरणातही भ्रष्टाचार केल्याचा आरोप, त्यांचे चुलतभाऊ आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असल्याचं दिसत आहे. पंकजा मुंडेंच्या अधिपत्याखाली असलेल्या महिला व बाल कल्याण विभागाने राज्याच्या 30 जिल्ह्यातील 85 हजार 452 अंगणवाडी केंद्रासाठी जवळपास लाखभर मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंकजा यांच्या विभागाने बंगळुरू स्थित एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि.या कंपनीकडून पॅनासोनिक इलुगा 17 हा मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. संगणक माहिती सक्षम रीयल-टाईम मॉनिटरींग (आयसीटी-आरटीएम) योजनेसाठी हा स्मार्टफोन्स खरेदी करण्यात येत आहेत. याबाबतचा सरकारी अध्यादेश (जीआर) 28 फेब्रुवारी 2019 रोजी काढण्यात आला असून, त्यात हे मोबाईल सिम कार्ड आणि डेटा प्लॅनसह अंगणवाडी सेविकांना वितरित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
पॅनासोनिक इलुगा 17 हा स्मार्टफोन मोबाईल खरेदी करताना प्रत्येक मोबाईल मागे कंपनीला सुमारे 2200 रूपये जास्तीची रक्कम देण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. पॅनासोनिक इलुगा 17 या मोबाईल फोनची बाजारपेठेतील किंमत 6 हजार 499 रूपये इतकी आहे. तर, हा मोबाईल 6000 ते 6400 रूपयांत उपलब्ध होतो. मात्र, पंकजा यांच्या विभागाने या मोबाईलची खरेदी करताना 8 हजार 777 रूपये इतकी किंमत मोजली आहे. त्यामुळे प्रत्येक मोबाईलची किंमत सुमारे 2200 रूपये इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच महिला व बाल कल्याण विभागाने एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि. या कंपनीकडून गरज नसताना आणखी 5,100 अतिरिक्त मोबाईल खरेदी केले आहेत, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सरकारी कामासाठी अशी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यापूर्वी कंपनीची पडताळणी करणे, गरजेचे असते. मात्र, या कंपनीचा पत्ताही निविदा कागदपत्रात दाखविण्यात आला नाही. यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असून याची चौकशी करायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देत, तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही धनंजय मुंडेंनी केली आहे.