‘त्या’ कटामागे धनंजय देसाईच
By admin | Published: March 20, 2015 01:38 AM2015-03-20T01:38:35+5:302015-03-20T01:38:35+5:30
हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय उर्फ मनोज जयराम देसाई याच्याच चिथावणीने करण्यात आला होता, असे स्पष्ट मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने देसाई यास जामीन नाकारला.
मुंबई : पुण्याच्या एका खासगी कंपनीतील आयटी मॅनेजर मोहसीन शेख याचा गेल्या वर्षी जूनमध्ये उन्नतीनगर येथे हॉकीस्टिक व दगडांनी मारहाण करून करण्यात आलेला खून हा मुस्लीम समाजाविरुद्ध पद्धतशीरपणे रचण्यात आलेल्या कटाचाच भाग होता व हा खून हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय उर्फ मनोज जयराम देसाई याच्याच चिथावणीने करण्यात आला होता, असे स्पष्ट मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने देसाई यास जामीन नाकारला.
मोहसीन शेख याचा २ जून रोजी खून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांना घटनास्थळी हल्लेखोरांनी सोडून दिलेल्या तीन मोटारसायकली मिळाल्या होत्या. त्या मोटारसायकलींच्या नंबर प्लेटवर ‘हिंदू राष्ट्र सेना’ असे व हेडलाईटवर ‘श्रीमंत योगी’ असे लिहून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टीकर लावलेले होते. एवढाच पुरावा हल्लेखोर देसाई अध्यक्ष असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचे होते, हे दाखविण्यास पुरेसे आहे, असे न्या. साधना जाधव यांनी जामीन फेटाळण्याच्या निकालात नमूद केले.
देसाई याच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी ही घटना घडल्याचा इन्कार केला नाही.
परंतु घटनेच्या वेळी देसाई तेथे हजर नव्हता. पोलिसांनी फौजदारी कटाचे (भादंवि कलम १२० बी) कलम लावून त्यास यात गोवले आहे.
त्यामुळे तो जामीन मिळण्यास पात्र ठरतो, असा युक्तिवाद केला. परंतु तो फेटाळताना न्या. जाधव यांनी म्हटले की, मोहसीन शेखवर हल्ला करणाऱ्यांमध्ये देसाई नव्हता हे खरे. पण कटाच्या गुन्ह्याचा मुख्य गाभा प्रत्यक्ष गुन्ह्याची कृती करण्यात नव्हे, तर गुन्हेगारी करण्याच्या मनोमिलनात असतो. (विशेष प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राची फेसबूकवर करण्यात आलेली कथित विटंबना मुस्लीम समाजातील व्यक्तीने केली असा पूर्णपणे निराधार समज करून घेऊन देसाई याने हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना कसे चिथावले व त्याचेच पर्यवसान मोहसीन शेख याच्यावरील खुनी हल्ल्यात कसे झाले याची संगतवार मांडणी सहायक पब्लिक प्रॉसिक्युटर अरफान सेठ यांनी तपासातून समोर आलेल्या पुराव्यांवरून केली. यासंदर्भात त्यांनी पोलिसांनी परवानगी नाकारूनही देसाई याने गेल्या वर्षी ९ जानेवारीला मांजरी येथे घेतलेली सभा, त्या सभेतील त्याचे मुस्लीम समाजाविरुद्ध गरळ ओकणारे भाषण, हल्लेखोरांनी हल्ला करीत असताना देसाई व हिंदू राष्ट्र सेनेचा केलेला जयजयकार इत्यादी गोष्टींचा उल्लेख केला.