मुंबई : पुण्याच्या मोहसीन शेख हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या धनंजय देसाईने आपण यापुढे खटला संपेपर्यंत हिंदू राष्ट्र सेनेच्या एकाही कार्यक्रमात सहभागी होणार नाही, अशी हमी उच्च न्यायालयाला दिली. त्याने दिलेल्या या आश्वासनानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.२०१४ मध्ये धनंजय देसाई याने पुण्यातील एका सभेत चिथावणीखोर भाषण केल्यानंतर त्या ठिकाणी दंगल झाली. त्या वेळी आयटी प्रोफेशनल मोहसीन शेख याची हत्या करण्यात आली. उच्च न्यायालयाने १७ जानेवारी रोजी देसाई याची जामिनावर सुटका केली. मात्र, काही दिवसांपूर्वीच आदेशाची प्रत उपलब्ध झाली. यानुसार, न्यायालयाने देसाई याचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला. त्यानुसार, खटला संपेपर्यंत देसाई याने हिंदू राष्ट्र सेनेचे कामकाज पाहायचे नाही, तसेच त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांत सहभागी व्हायचे नाही व भाषणही द्यायचे नाही, असे यात नमूद करण्यात आले होते.देसाई याने उच्च न्यायालयाच्या अन्य एका खंडपीठापुढे खटल्यावरील स्थगिती उठविण्यासाठी अर्ज केला आहे. २०१७ मध्ये त्याच्याच अर्जावरून खटल्याला स्थगिती दिली. सत्र न्यायालयाने आठ वेळा देसाईचा जामीन अर्ज फेटाळला, तर उच्च न्यायालयाने एकदा अर्ज फेटाळला आहे, पण न्या. साधना जाधव यांनी ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केला. ‘लोकांना मुस्लीम समाजाविरुद्ध भडकविण्याचे काम केल्याचा आरोप देसाई याच्यावर आहे. मात्र, त्याने हमी दिल्याने त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात येत आहे,’ असे न्यायालयाने म्हटले. देसाई याच्यावर अनेक गुन्हे नोंदवूनही पोलिसांनी त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्याशिवाय काहीही केले नाही, असेही निरीक्षण उच्च न्यायालयाने या वेळी नोंदविले.काय म्हणतात पोलीसपोलिसांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या परवानगीशिवाय देसाई याने चिथावणीखोर भाषण केले. त्याच्या या भाषणामुळे हिंदू गट हिंसक झाला आणि हडपसर येथे दंगल झाली. त्या वेळी तेथून एका बाइकवरून दोन मुले जात होती. मोहसीन आणि त्याचा मित्र बाइकवर होता. जमाव मोहसीनला मारहाण करत असताना, त्याचा मित्र रियाज तेथून पळ काढण्यात यशस्वी झाला. त्यानंतर देसाईला अटक करण्यात आली.
हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यक्रमांत भाग घेणार नाही, धनंजय देसाईची उच्च न्यायालयाला हमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 7:08 AM