Dhananjay Munde: राज्यात आजपासून 10 दिवस 'समता कार्यक्रम', डॉ. बाबासाहेबांची अभिनव जयंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 12:12 PM2022-04-06T12:12:28+5:302022-04-06T12:18:30+5:30

आजपासून सलग दहा दिवस (06 एप्रिल ते 16 एप्रिल) राज्यातील सर्व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महामानवास अभिवादन करणार

Dhananjay Munde: 10 days equality program in the state from today, Babasaheb's birth anniversary, Says Dhananjay Munde | Dhananjay Munde: राज्यात आजपासून 10 दिवस 'समता कार्यक्रम', डॉ. बाबासाहेबांची अभिनव जयंती

Dhananjay Munde: राज्यात आजपासून 10 दिवस 'समता कार्यक्रम', डॉ. बाबासाहेबांची अभिनव जयंती

Next

मुंबई - : सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती राज्यभरात आजपासून (दि. 06) सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

06 एप्रिल ते दि. 16 एप्रिल राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम" राबविण्याचे नियोजन विभागाने केले असून, यासाठी विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी व देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत विभागाचे सहसचिव, समाज कल्याण आयुक्त, बार्टी चे महासंचालक तसेच मुंबई शहराचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आदींचा समावेश करण्यात आला आहे. 

असा असेल सामाजिक समता कार्यक्रम...

सामाजिक न्याय विभागाने दि. 06 एप्रिल पासून सलग दहा दिवस राज्यातील सर्व जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असलेल्या दैनंदिन उपक्रमांचे शासन परिपत्रक जारी केले आहे. 

या परिपत्रकानुसार दि. 06 एप्रिल रोजी या सामाजिक समता कार्यक्रमाचे सर्व जिल्ह्यांमधून उद्घाटन करण्यात येईल व पुढील उपक्रमांची जिल्हा स्तरावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आली आहे. 

दि. 07 एप्रिल रोजी विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतील. 

दि. 08 एप्रिल रोजी, जिल्हा व विभाग स्तरावर कार्यक्रम आयोजित करून स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येईल.

दि. 09 एप्रिल रोजी, ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबवणे तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक अस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातील.

दि. 10 एप्रिल रोजी, समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहिती बाबत प्रबोधन करण्यात येईल.

दि. 11 एप्रिल रोजी, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल.

दि. 12 एप्रिल रोजी, मार्जिन मनी योजनेच्या जनजागृती बाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. 

दि. 13 एप्रिल रोजी, संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. 

14 एप्रिल, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्याठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल. याच दिवशी सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करतील. 

15 एप्रिल, प्रत्येक सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करून बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल.

16 एप्रिल या अंतिम दिवशी, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल. 

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबविला जाणार असून, प्रत्येक जिल्ह्यात वरीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना सोपविण्यात आली आहे. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत तसेच यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ही मुंडे यांनी केले आहे.

Web Title: Dhananjay Munde: 10 days equality program in the state from today, Babasaheb's birth anniversary, Says Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.