धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केलं जातंय, त्यांच्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा नाही: जयंत पाटील
By मोरेश्वर येरम | Published: January 14, 2021 03:59 PM2021-01-14T15:59:06+5:302021-01-14T16:04:54+5:30
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे असले तरी तक्रारदार महिलेकडून त्यांना याआधीपासूनच ब्लॅकमेल केलं जात होतं.
मुंबई
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे ते अडचणीत सापडले आहेत. मुंडे यांच्यावरील आरोपांनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं म्हटलं आहे.
तपास करणाऱ्या अधिकारी धनंजय मुंडे यांच्या जवळच्या; वकिलांचा गंभीर आरोप
"धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे असले तरी तक्रारदार महिलेकडून त्यांना याआधीपासूनच ब्लॅकमेल केलं जात होतं. त्याबाबत मुंडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. याचाही विचार आपण करायला हवा. त्यामुळे पोलीस या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करतील आणि सर्वबाजूंचा विचार करतील असा विश्वास आहे", असं जयंत पाटील म्हणाले. ते मुंबईत पक्षाच्या प्रदेशकार्यालयाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलत होते.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर, लवकर निर्णय घेऊ: शरद पवार
"धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. कुणीही येऊन एखाद्यावर आरोप केले अर्थात आरोप हे अतिशय टोकाचे असले तरी त्याबाबत लगेच निष्कर्षापर्यंत पोहचणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल", असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवारांनी सोडलं मौन, म्हणाले...
जयंत पाटील मुंडेंच्या पाठीशी
"धनंजय मुंडे यांनी संपूर्ण प्रकरणाची मला माहिती दिली. जी आम्हाला याआधीपासूनच माहित होती. तक्रारदार महिलेकडून याआधीपासूनच धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. त्याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. पण त्यावेळी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टात देखील गेलं आहे. पोलीस आता त्यांचं काम करतील. त्यांच्या कामात आम्ही कोणताही अडथळा आणणार नाही", असं म्हणज जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.