मुंबई - राज्यातील मागास आणि विविध महामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन अनेकांना फायदा होईल, असे सामाजिक न्यायमंत्रीधनंजय मुंडे यांनी म्हटलंय. मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शासन निर्णय शेअर केला आहे. त्यामध्ये, विविध विकास महामंडळांच्या रकमेत झालेली वाढ देण्यात आली आहे. राज्य कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल 500 कोटींवरून वाढवून 1000 कोटी करणे. तसेच, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे भागभांडवल 73 कोटींवरून 1000 कोटी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासोबतच, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भागभांडवल 300 कोटींवरून 1000 कोटी करणे आणि दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल 50 कोटींवरून 500 कोटी करण्याचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.