लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: करुणा मुंडे यांना देखभालीचा खर्च देण्याच्या दंडाधिकाऱ्यांचा अंतरिम आदेशाला राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. करुणा शर्मा यांच्याशी कधीही विवाह केला नाही, असा दावा मुंडे यांनी अपिलात केला आहे. मुंडे आणि करुणा यांचा विवाह झाला आहे, हा दंडाधिकाऱ्यांनी काढलेला निष्कर्ष अयोग्य आहे, असे मुंडे यांनी अपिलात म्हटले आहे.
‘दंडाधिकाऱ्यांनी सारासार विचार न करताच अंतरिम देखभालीचा खर्च देण्याचा आदेश दिला. पक्षाच्या कामानिमित्त करूणा शर्मा यांची आणि धनजंय मुंडे यांच्यात ओळख झाली. वारंवार झालेल्या भेटीगाठी आणि संवादामुळे वैयक्तिक संबंध निर्माण झाले’, असे अपिलात म्हटले आहे. ‘या संबंधातून दोन मुलांचा जन्म झाला. अधिकृत कागदावर या मुलांना आपले नाव, आडनाव वापरण्याची मुभा दिली. करुणा शर्मा यांना आपला आधी एक विवाह झाला आहे, याची माहिती होती. तरीही, त्यांनी स्वेच्छेने नातेसंबंध ठेवले, असा दावा मुंडे यांनी केला आहे.
‘करुणा शर्मा यांनी खूप मोठी रक्कम मागितली’
२०१९ ची निवडणूक जिंकल्यानंतर आपल्याला राज्य मंत्रिमंडळात सामील करून घेण्यात आले. त्यामुळे पत्नी राजश्री हिच्यासह मुंबईच्या शासकीय निवासस्थानात राहायला आलो आणि त्यानंतर करुणा शर्मा यांच्या वागण्यात आमूलाग्र बदल झाला. करुणा शर्मा आणि तिचे कुटुंबीय सबबीखाली खूप मोठी रक्कम मागू लागल्या. त्यानंतर करुणा यांनी निरनिराळ्या सोशल मीडियावर त्यांची ‘करुणा धनंजय मुंडे’ या नावाचा वापर करून अकाऊंट सुरू केले, असे अपिलात म्हटले आहे. ४ फेव्रुवारी रोजी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा १ लाख २५ हजार रुपये तर मुलीसाठी ७५ हजार रुपये देखभालीचा खर्च म्हणून देण्याचे निर्देश दिले आहेत.