Join us

गिरीश महाजन यांना लाज कशी वाटत नाही; तात्काळ राजीनामा घ्या- धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 12:03 PM

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची असंवेदनशीलता एका व्हिडीओच्या माध्यमातून चव्हाट्यावर आली आहे.

मुंबईः जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची असंवेदनशीलता एका व्हिडीओच्या माध्यमातून चव्हाट्यावर आली आहे. पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेले गिरीश महाजन चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत जणू पर्यटन सहलीलाच निघाले की काय, अशा आविर्भावात फिरताना दिसत आहेत. गिरीश महाजन यांच्यासोबत काही कार्यकर्ते आणि पोलीसही या बोटीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आता विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून त्यांना खडे बोल सुनावले आहेत. सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय! 'त्या' लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं. मंत्री महोदय मात्र सेल्फी काढण्यात मग्न आहेत. यांना लाज कशी वाटत नाही. मुख्यमंत्री या संवेदनशील वागण्याची दखल घेणार का?, असा प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे. मंत्र्यांनी मदत करण्याऐवजी सेल्फी काढून अशा प्रकारच्या जाहिराती करणं दुर्दैवी आहे. हेलिकॉप्टरमधून फिरणं ही कोल्हापूर आणि सांगलीकरांना आवडणारी गोष्ट नाही. सांगलीतून अनेकांचे फोन आले आहेत, आम्हाला मदत पोहोचवा. जिल्हाधिकारी काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. निषेध करावा तेवढा थोडा आहे. मुख्यमंत्र्यांनी खाली उतरून लोकांना भेटले असते तर लोकांना दिलासा मिळाला असता. पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न पूर्ण ताकदीनं सुरू आहेत. पाणी कमी होऊ लागल्यानंतर अधिकारी दिसू लागले आहेत. तिथे अजून बोटी पोहोचलेल्या नाहीत, लोकांना पुरातून काढायची व्यवस्थाच झालेली नाही. 7 दिवस पाणी वाढलेलं आहे. पण काहीच मदतकार्य पोहोचलेलं नाही, असं म्हणत जयंत पाटलांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :गिरीश महाजन