धनंजय मुंडेंचा फडणवीसांना प्रतिटोला; तर उद्या सुरेश धस यांना मुख्यमंत्री करा अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 03:07 PM2019-08-27T15:07:09+5:302019-08-27T15:07:52+5:30
धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटी आकडेवारी सांगतात त्यांनी माझ्यासमोर एकदा जाहीर व्यासपीठावर चर्चेला यावं असं आव्हान दिलं होतं.
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पळ काढता येणार नाही. मंत्री मंडळाचे प्रमुख म्हणून 16 मंत्र्यांच्या 90 हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराची जबाबदारी तुमचीच आहे. या भ्रष्ट मंत्र्यांना क्लीनचीट देताना घाबरला नाहीत, मग आता चर्चेला का घाबरता? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत होणार्या ठिकठिकाणच्या सभेत धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार मधील 16 मंत्र्यांच्या 90 हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा कायम लावून धरला आहे. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटी आकडेवारी सांगतात त्यांनी माझ्यासमोर एकदा जाहीर व्यासपीठावर चर्चेला यावं. मी तुमच्या मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यानिशी सिद्ध करतो असं थेट आव्हान दिलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत धनंजय मुंडे यांच्यासाठी मी स्वत: पंकजाताई किंवा प्रीतमताईंची गरज नाही तर फक्त आमचे आमदार सुरेश धस पुरेसे आहेत अशा शब्दात टोला लगावला होता.
त्यावर आज धनंजय मुंडे यांनी पुन्हा दोन ट्विट करून मुख्यमंत्र्यांना प्रतिटोला लगावला आहे. तुमच्या सांगण्यानुसार उद्या सुरेश धस यांना मुख्यमंत्री करा मग त्यांच्याशीही भ्रष्टाचाराविषयी चर्चा करू, पण आज मुख्यमंत्री तुम्ही आहात तुम्हालाच याची जबाबदारी घ्यावी लागेल. राज्यातील 11 कोटी जनतेला तुम्हालाच उत्तर द्यावे लागेल, असे म्हणत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचारावरून खिंडीत पकडले आहे असं त्यांनी सांगितले.
सोमवारी दिवसभर महाजनादेश यात्रा बीड जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती. दुपारी कडा, आष्टी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा झाल्या. तसेच रॅलीच्या माध्यमातून पुन्हा जनादेश देण्याचे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले. दरम्यान, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी बीड तालुक्यातील काकडहिरा येथे मुख्यमंत्री व यात्रा स्वागत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु लोकसभेला मेटेंनी केलेला विरोध पाहता पंकजा मुंडे या स्वागत कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या नाहीत. त्या मुख्यमंत्र्यांच्या वाहनातच बसून राहिल्या. यावेळी आ. विनायक मेटे यांनी कोणी काहीही केले तरी आमची भाजपसोबत असलेली युती कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. तसेच यात्रेच्या निमित्ताने घटक पक्ष म्हणून स्वागत करणे आमचे कर्तव्य देखील असल्याचे ते म्हणाले.