मुंबई - शिवसेना आणि भाजपा मिळून कोकणातील जनतेची फसवणूक करत आहेत, नाणार प्रकल्पासंदर्भात असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. भाजपा व शिवसेनेच्या दुटप्पी धोरणामुळे जनतेच्या मनात दोघांची पत राहिलेली नाही, असंही मुंडे म्हणाले होते.
नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. रत्नागिरीमधील सागवे-कात्रादेवी इथल्या नाणार येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही, उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ही घोषणा केली. यावरुन धनंजय मुंडेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
नाणार प्रकल्प भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याचा फार्स असल्याचाही आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. ज्यावेळेस अधिसूचना निघाली तेव्हा उद्योगमंत्री काय करत आहेत, असा प्रश्नही मुंडे यांनी उपस्थित केला आहे. सत्तेसाठी शिवसेना बेईमानी करू शकते, असे टीकास्त्र मुंडेंनी सोडले आहे.
अधिसूचना रद्द करायची असेल तर तहसीलदार कडून जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सचिवांना प्रस्ताव जावा लागतो. यानंतर ती फाईल मंत्र्यांकडे येते. पण अद्याप एका ओळीची फाईल ठेवण्यात आलेली नाही, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.
दरम्यान, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा करून काही तास उलटत नाहीत तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया दिल्याने नाणार येथील सभेला काही तास उलटत नाहीत तोच तोंडघशी पडण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे.