मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना 16 दिवसांच्या उपचारानंतर आज ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी दिला आहे.
3 जानेवारीला मध्यरात्री नंतर धनंजय मुंडे यांच्या कारला परळी येथे अपघात झाला होता. त्यानंतर छातीला जखमा असल्याने त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रीच कँडी रुग्णालयात धनंजय मुंडे यांना भेटून त्यांची विचारपूस करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, मंत्रिमंडळातील आजी-माजी सदस्य, खासदार, आमदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या दरम्यान येऊन गेले. मुंडेंच्या हजारो समर्थकांनी देखील भेटून विचारपूस करत या काळात काळजी व्यक्त केली.
दरम्यान, पुढील काही दिवस डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली असल्याने मुंबईतील निवासस्थानी काही दिवस विश्रांती घेऊन परळी येथे लवकरच सर्वांना भेटून पुन्हा जनसेवेत दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सक्तीच्या विश्रांतीसाठी पुढील काही दिवस सहकारी-कार्यकर्त्यांनी भेटायला येऊ नये, असे आवाहन मुंडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. या काळात उपचार केलेले सर्व डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातील कर्मचारी, विचारपूस करून काळजी व्यक्त केलेले सर्व मान्यवर तसेच समर्थकांचेही धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत.