Dhananjay munde: मनसेनं धनंजय मुंडेंचा 'तात्या विंचू' केला, राज ठाकरे करणार ओम फट स्वाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 05:26 PM2022-04-20T17:26:03+5:302022-04-20T17:40:57+5:30
राज्यात मशिदीच्या भोंग्यावरून राजकारण पेटलं असताना राष्ट्रवादी आणि मनसे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही.
मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मनसेवर टिका केली आहे. विशेष म्हणजे मिटकरींनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीतच भाषण करताना, राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे असा केला. त्याच सभेत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही राज ठाकरेंवर टिका केली. आता, मनसेच्या नेत्यांकडून या दोन्ही नेत्यांवर पलटवार करण्यात आला आहे.
राज्यात मशिदीच्या भोंग्यावरून राजकारण पेटलं असताना राष्ट्रवादी आणि मनसे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. मंत्री धनंजय मुंडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अर्धवटराव उपमा दिल्यानंतर आता मनसेनेही जोरदार पलटवार केला आहे. धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग आहे अशा शब्दात मनसेचे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी मुंडे यांच्या टीकेचा समाचार घेतला. त्यानंतर, अमेय खोपकर यांनीही धनंजय मुंडेंना तात्या विंचू असे संबोधले आहे.
''अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’ म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा करणार आहेत. राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार. Get Well Soon धनंजय मुंडे'', असे ट्विट खोपकर यांनी केले आहे. तर, मनसेच्या गजानन काळे यांनीही धनंजय मुडेंना टोला लगावला आहे.
अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’ म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा करणार आहेत.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 20, 2022
राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार.
Get Well Soon धनंजय मुंडे
''दादांच्या सकाळ च्या शपथविधीला फोन स्विच ऑफ करून बसले होते हे दिवसभर. पवारसाहेबांनी डोळे वटारले आणि अर्धवट आंघोळ करून साहेब माफ करा म्हणून विनवणी करू लागले..मनासारखं खात मिळालं नाही म्हणून आज ही दबक्या आवाजात हे बोलत असतात... असे हे मुंगेरीलाल राजसाहेब यांच्यावर बोलणार... गम्मत आहे.'', असे ट्विट नवी मुंबईतील मनसे नेते गजानन काळे यांनी केले आहे.
दादांच्या सकाळ च्या शपथविधीला फोन स्विच ऑफ करून बसले होते हे दिवसभर.
पवारसाहेबांनी डोळे वटारले आणि अर्धवट आंघोळ करून साहेब माफ करा म्हणून विनवणी करू लागले..मनासारखं खात मिळालं नाही म्हणून आज ही दबक्या आवाजात हे बोलत असतात...असे हे मुंगेरीलाल राजसाहेब यांच्यावर बोलणार..गम्मत आहे.— Gajanan Kale (@GajananKaleMNS) April 20, 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी ३ मे पर्यंत मुदत दिली आहे. जर ३ मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा त्यांनी दिला आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. धार्मिक तेढ निर्माण होऊ शकतो असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. त्याचसोबत राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही वैयक्तिक टीका केल्यानंतर मनसेकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले की, पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपाच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे. अर्धवटराव आधी भाजपाविरोधात बोलायचे. सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.