मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी धनंजय मुंडे यांच्या कारला परळीमध्ये मंगळवारी(दि.3) रात्री अपघात झाला आहे. यामध्ये मुंडे यांच्या छातीला आणि डोक्याला मार लागला. या अपघातात मुंडेंच्या कारचंही मोठं नुकसान झालं. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आज पंकजा मुंडे यांनी त्यांची भेट घेतली.
पंकजा मुंडे आणि धनजंय मुंडे यांच्यात असलेलं राजकीय वैर सर्वश्रूत आहे. अनेकदा ते सार्वजनिक मंचावरुन एकमेकांवर टीका करतात. पण, गरजेवेळी ते नेहमी एकमेकांच्या पाठीशीही उभे असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. आताही राजकीय वैर विसरुन पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. या भेटीचे काही फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करताना दिसत आहेत.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी रात्री 12च्या सुमारास परळीमध्ये अपघात झाला होता. दुसऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली होती. 'मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे,' अशी माहिती ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली होती.