मुंबई - पूर्वी लोकांच्या कामासाठी आपण मंत्रालयात यायचो तेव्हा एक वडापाव खाऊन दिवस दिवस काढायचो आणि मंत्रालयातील लोकांच्या कामांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचो, त्यावेळी याच मंत्रालयात कधी आपण मंत्री होऊन येऊ असे वाटले नव्हते, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भावना व्यक्त केली.
महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय खात्याचा पदभार मंत्रालयातील सहाव्या मजल्यातील दालनात येऊन स्वीकारला. मुंडेंनी पदभार स्वीकारताच आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी अनेकांनी दालनात गर्दी केल्याने कार्यालय अक्षरशः हाऊसफुल झाले होते.
पदभार स्वीकारण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी दुपारी प्रथम दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत अभिवादन केले. त्यानंतर मुंडे यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. मीनाताई ठाकरे यांनाही अभिवादन केले. पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून सहाव्या मजल्यावरील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, पवार साहेबांनी मला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या अतिमहत्त्वाच्या विभागाची जबाबदारी दिली त्याबाबत मी साहेबांचे आभार व्यक्त करतो. समाजातील वंचित घटकांना न्याय देणारा हा विभाग आहे. आतापर्यंत या विभागाने समाजातील वंचित आणि गोरगरिबांसाठी चांगले काम केले आहे. यापुढेही हा विभाग अतिशय गतीमान पद्धतीने काम करणार. ज्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती जबाबदारी मी चोख पद्धतीने पार पाडण्यासाठी सदैव तत्पर राहीन असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.