“पंढरीच्या वारीपासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत सर्वांना दिलासा देणारा अर्थसंकल्प”: धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 06:19 PM2024-06-28T18:19:14+5:302024-06-28T18:19:45+5:30

Dhananjay Munde Reaction On Maharashtra Budget 2024: विकासाची दूरदृष्टी असलेला हा अर्थसंकल्प असल्याचे मत मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

dhananjay munde reaction on maharashtra budget 2024 | “पंढरीच्या वारीपासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत सर्वांना दिलासा देणारा अर्थसंकल्प”: धनंजय मुंडे

“पंढरीच्या वारीपासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत सर्वांना दिलासा देणारा अर्थसंकल्प”: धनंजय मुंडे

Dhananjay Munde Reaction On Maharashtra Budget 2024: राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, महाविकास आघाडीकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे. सत्ताधारी महायुतीकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत केले असून, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी हा अर्थसंकल्प सर्वांना दिलासा देणारा असल्याचे म्हटले आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला या अर्थसंकल्पात पंढरीच्या वारी पासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत सर्व समाज घटकांना दिलासा देणारा व विकासाची दूरदृष्टी असलेला हा अर्थसंकल्प असल्याचे मत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. महिला आर्थिक धोरण, महिलांचा विकास,  गृहिणींवरील कौटुंबिक ताण तणाव कमी करणे आदी करण्यासह या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, युवा वर्ग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेवर भर देण्यात आला आहे, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांनी सरकारचे आभार मानले

आजच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारने सन २०२३-२४ सालच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला भाव मिळाला नाही त्यामुळे घोषणा केल्याप्रमाणे सन २०२३-२४ मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा आज करण्यात आली आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत धनंजय मुंडे यांनी सुरू केलेल्या संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतील सर्व ८२ वसतिगृहे उभारण्यास मान्यता देण्यात आली असून, याबद्दल धनंजय मुंडे यांनी सरकारचे आभार मानले. 

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे

मुख्यमंत्री कृषी वीज बिल सवलत योजना, तसेच त्यातून मागेल त्याला सौर पंप देणे, त्याचबरोबर आणखी महत्त्वाचे म्हणजे साडेसात हॉर्स पावर पर्यंतच्या कृषी पंपांना आता पूर्णपणे मोफत वीज देणे, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी खास अनुदान, जलयुक्त शिवार टप्पा २ साठी ६५० कोटींचा निधी, शेती क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी संशोधन करण्यास १०० कोटींचा विशेष निधी, नानांनी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यात राबवण्यास मान्यता, शेत मालासाठी गाव तिथे गोदाम योजनेस ३४१ कोटी, एक रुपयात पीकविमा योजनेत ई-पंचनामा प्रणाली असे अनेक दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुंडे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शाश्वत शेती व शेतकऱ्यांना दिलासा आणि आर्थिक सक्षमतेवर भर देणाऱ्या, विकासाची दूरदृष्टी असलेल्या अर्थसंकल्प तरतुदींसाठी धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांना धन्यवाद दिले.
 

Web Title: dhananjay munde reaction on maharashtra budget 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.