मुंबई - पूरग्रस्त भागात डॉक्टरसह इतर सर्व सुविधा वाढवणं गरजेचं आहे. दवाखान्यांची संख्या, मूर्तीकारांचे झालेले नुकसान पाहून सरकारने मोठी मदत देणं गरजेचं आहे. ही राजकारण करायची वेळ नाही. पण, सुरुवातीचे 5 दिवस राज्य सरकार कुठं बेपत्ता होतं? याबाबतचा जाबा जनता विचारत आहे, त्याचं उत्तर येणाऱ्या काळात सरकारला द्याव लागणार आहे, असे विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिलेल्या क्लिनचीटबाबत प्रश्न विचारला असता मुंडेंनी आक्रमक शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्र्यांना जनाची नाही, तर मनाजी लाज असेल तर या दोन्ही नेत्यांचे राजीनामे घेतले पाहिजे. या दोन नेत्यांनी जी नौटंकी केलीय, ती सगळ्या जगानं पाहिलीय. माननीय पिस्तुलराव महाजन असे म्हणत मुंडे यांनी गिरीश महाजनांवर टीका केली. या दोन्ही मंत्र्यांना क्लिनचीट देऊन मुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचंही मुंडे म्हणाले.
सरकारला महाराष्ट्रातील पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्तांचं काहीही देणघेणं नाही. मुख्यमंत्र्यांना केवळ पुन्हा मीच मुख्यमंत्री एवढच सांगायचं आहे. त्यामुळेच महाधनादेशावर महाजनादेश यात्रा काढण्याचं त्यांचं काम सुरू असल्याचंही मुंडे म्हणाले. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, केंद्र सरकारकडे 6813 कोटींची मागणी करणार असून पूरग्रस्तांचे पुनर्वसन केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.