मुंबई - दसऱ्याच्या मुहुर्तावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राफेल विमानाची पूजा करण्यात आली. यावेळी लढाऊ विमानाच्या चाकांखाली लिंबू ठेवण्यात आले होते. या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर याच्यावर जोरदार टीका होण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही राफेल विमानाच्या पुजेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे.
राफेलसारखं अत्याधुनिक लढाऊ विमान भारताच्या ताफ्यात दाखल करताना सरकार अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची ऐशी तैशी! असंही म्हटलं आहे. वशीकरण स्पेशालिस्ट, सर्व तांत्रिक-मांत्रिक भाजपाच्या चमूमध्ये दाखल झाले आहेत. आता आपल्या देशाला कोणाचीच नजर लागणार नाही असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून बुधवारी (9 ऑक्टोबर) 'अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची ऐशी तैशी! देशाच्या रक्षणासाठी #Rafale आणलंय अन् राफेलच्या यशस्वी उड्डाणासाठी लिंबांचा उतारा ठेवला जातोय. वशीकरण स्पेशालिस्ट, सर्व तांत्रिक-मांत्रिक भाजपाच्या चमूमध्ये दाखल झाले आहेत. आता आपल्या देशाला कोणाचीच नजर लागणार नाही' असं ट्वीट केलं आहे. तसेच RafalePujaPolitics असा हॅशटॅगही वापरला आहे.
फडणवीस सरकारने आरेमधील झाडांची कत्तल केल्यानंतर चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका केली जात आहे. उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका शुक्रवारी फेटाळताच प्रशासनाने सुमारे मध्यरात्रीत 500 झाडे पाडली. प्रशासनाने मध्यरात्रीत झाडे तोडल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनीही भाजपाच्या आडून शिवसेनेवर जोरदार प्रहार केला होता. शिवसेनेने सत्तेत असतानाही कारशेडमधील झाडे तोडण्यास विरोध केला होता. एवढी झाडे तोडून झाल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुखांनी सत्ता आल्यावर बघू, असं म्हटल्याचा हवाला देत शिवसेनेवर कुरघोडी केली. कार्यकारी अध्यक्ष म्हणतात, झाडं तोडणाऱ्यांचे काय करायचे ते नव्याने सरकार आल्यानंतर ठरवू. खरं तर उद्धव ठाकरे यांचे नाव बदलून 'यू-टर्न' ठाकरे ठेवायला हवे. सत्तेपुढे लाचार होत सगळ्याच मुद्द्यावर ते यू-टर्न घेत असतात, अशी टीकाही धनंजय मुंडेंनी केली होती.