पंकजा मुंडेंच्या विधानावर धनुभाऊंनी घेतली फिरकी, नाराजीबाबतही स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 06:01 PM2022-09-28T18:01:41+5:302022-09-28T18:03:54+5:30
कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या जर त्यांच्याच देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्याबाबतीत असं बोलत असतील तर काय बोलावं
मुंबई - भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 'मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) हरवू शकत नाहीत,' असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर आता स्वतः पंकजा यांनी खुलासा केला आहे. मात्र, त्यानंतर त्यांचे राजकीय विरोधक आणि चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी गुगली टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. आपल्या पक्षाच्या देशाच्या सर्वोत्तम नेत्यांबद्दल असं बोलत असतील तर मी काय बोलू, असे म्हणत धनंजय मुडेंनी एकप्रकारे त्यांना चिमटा काढला आहे.
कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या जर त्यांच्याच देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्याबाबतीत असं बोलत असतील तर काय बोलावं. मला एवढंच माहिती आहे की, मागील विधानसभेच्या निवडणुकीत काय झालं, काय नाही झालं जनता काय करू शकते हे सगळं माहितीय. पंकजा या त्यांच्या पक्षात नाराज आहेत की नाहीत, हे मी कसं काय सांगू शकतो, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले.
पंकजा मुंडेंकडून खुलासा
याबाबत माध्यमांशी बोलताना पंकजा म्हणतात की, मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला होता. यात मोदीजींबद्दल कुठेही नकारात्मक उल्लेख केला नाही. मी भाषणातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात, पात, पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याकरीता नविन पद्धतीचे राजकारण करण्याचे आवाहन केले होते. या संदर्भाने मोदीजींचा उल्लेख केला होता, असे पंकजा म्हणाल्या.