Join us

बारावीच्या निकालासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार - धनंजय मुंडे  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 4:58 PM

विज्ञान शाखेतील निकालात तब्बल ३.५ टक्क्यांनी घट झाली आहे.

मुंबई : बारावीच्या दोषपूर्ण निकालामुळे मुंबईतील हजारो विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग, मेडिकल, औषध निर्माण, आर्किटेक्चर व तत्सम शैक्षणिक अभ्यासक्रमांची संधी हुकण्याची भीती निर्माण झाली असून या विद्यार्थ्यांच्या या समस्येसंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. यावर्षी परिक्षा मंडळाकडून डाटा फिडींगमध्ये त्रुटी राहिल्याने राज्यात लागलेला बारावीचा निकाल हा दोषपूर्ण असल्याची बाब पुढे आली आहे. विज्ञान शाखेतील निकालात तब्बल ३.५ टक्क्यांनी घट झाली आहे.

विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांना जेईई, जेईई ॲडव्हान्स यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय वरच्या श्रेणीचे गुण मिळाले असताना बारावीत महत्वाच्या विषयांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्याने त्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल, औषध निर्माण, आर्किटेक्चर या करीअरपासून वंचित रहावे लागणार आहे.  त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यासक्रमांची संधी हुकण्याची भीती पालकांनी आज धनंजय मुंडे , मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांची भेट घेऊन व्यक्त केली. 

या संदर्भात हजारो पालक व विद्यार्थी गेल्या २ दिवसांपासून शिक्षण मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधत आहेत. पण शासनाकडून, मंडळाकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही त्यामुळे आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या रास्त मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश देण्याची मागणी करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

परीक्षा मंडळाकडून दोषपूर्ण निकाल लागल्यानंतर आतापर्यंत ३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काही मुलं घरातून बेपत्ता आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये पुढील शैक्षणिक भवितव्याबद्दल चिंतेचे व असंतोषाचे वातावरण आहे. शिक्षणमंत्री या भोंगळ कारभाराची जबाबदारी घेणार का? असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रशिक्षणधनंजय मुंडेविद्यार्थी