मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जाब विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा का कमी केली ? असा प्रश्न मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. हे पत्र त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही शेअर करत मुख्यमंत्र्यांना #जबावदो या हॅशटॅगने मेंशन केले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असून त्यांच्या घराची रेकीही करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांचाही तसा अहवाल आहे. त्यामुळे मी आव्हाड यांच्या घराची सुरक्षा वाढविण्याची मागणी आपणाकडे केली होती. मात्र, आव्हाड यांच्या घराची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. आमदार आव्हाड हे हीटलिस्टवर आहेत, असे एटीएसने सांगितले आहे. पण, सरकारने त्यांची सुरक्षा कमी केल्याने संशय निर्माण होत आहे. सरकारचा हा गलथानपणा आहे की, सनातनी प्रवृत्तींना मदत करणे हा उद्देश आहे, याबाबत मनात संशय येतो, असेही मुंडे यांनी म्हटले आहे. यापूर्वी सांगली व पुणे येथे आव्हाड यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले आहेत. तर एटीएसनेही ते हीटलिस्टवर असल्याचे सांगितले आहे. मात्र, सरकार याबाबत निष्काळजी असल्याचे दिसते. तसेच एक विधानसभा सदस्य या नात्याने त्यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही. त्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत आव्हान यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास, त्याची जबाबदारी सरकारकडे राहिल, असेही मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.