Join us

धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे! महिला धोरणाची अंमलबजावणी, मंत्रालयातील नावाची पाटी बदलली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 1:36 PM

Dhananjay Munde : राज्याचे चौथे महिला धोरण 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी लागू करण्यात आले.

मुंबई : राज्यात नव्याने घोषित करण्यात आलेल्या चौथ्या महिला धोरणातील नियमाची राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अंमलबजावणी केली असून त्यांनी आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावाआधी आईचे नाव असलेली पाटी आपल्या मंत्रालयातील दालनामध्ये लावली आहे. त्यामुळे आता धनंजय यांचे संपूर्ण नाव 'धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे' असे नाव असणारी पाटी आता मंत्रालयात लावण्यात आली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून राज्याचे चौथे महिला धोरण नुकतेच घोषित करण्यात आले. या महिला धोरणामध्ये स्त्री-पुरुष समानतेला विशेष महत्त्व देण्यात आले असून आईचे आयुष्यातील स्थान देखील अधोरेखित करण्यात आले आहे. 

त्यामुळे आता नव्या धोरणानुसार शासकीय कामकाजामध्ये आपले संपूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लिहिण्याची प्रथा नव्याने सुरू करण्यात आली असून याची अंमलबजावणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयीन दालनात 'धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे' अशा नावाची पाटी लावण्यात आली आहे. 

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनाबाहेरील नावाची पाटी सुद्धा बदलण्यात आली आहे. राज्याचे चौथे महिला धोरण 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी लागू करण्यात आले. यानंतर पहिल्याच कार्यालयीन दिवशी मंत्रालयात 'अजित आशाताई अनंतराव पवार' नावाची पाटी झळकली. चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :धनंजय मुंडे