मुंबई : धनगर आरक्षणावरून आक्रमक झालेल्या समाज बांधवाने अफवांवर विश्वास न ठेवता संयम ठेवण्याचे आवाहन याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात ते बोलत होते. आरक्षणासंदर्भात सर्व पुरावे सुरक्षित असून २७ मार्चला पुकारलेले आंदोलन स्थगित केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पाटील म्हणाले की, धनगर समाजाने अनुसूचित प्रकारे आंदोलन करावे, म्हणून काही समाजकंटक प्रयत्न करत आहेत. मात्र उच्च न्यायालयात सादर केलेली सर्व कागदपत्रे सुरक्षित आहेत. न्यायालयीन लढा देऊनच एसटी प्रवर्गाचे दाखले मिळवायचे आहेत. दरम्यान, याचिका एकत्र करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आचारसंहितेमुळे सानपाडा ते आझाद मैदानापर्यंत २७ मार्चला काढण्यात येणा-या धडक मोर्चाला स्थगिती देत नसून सरकारच्या मानसिकतेमुळे मोर्चा पुढे ढकलल्याचे पाटील यांनी सांगितले. आचारसंहितेमध्येही मोर्चे काढता येतात. मात्र न्यायालयात सरकारकडून होणारा युक्तीवाद आरक्षणाच्या बाजूने दिसत आहे. त्यामुळे मोर्चाला स्थगित दिल्याचे त्यांनी सांगितले.