धनगर समाजाच्या मागणीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल; धनगर आणि धनगड एकच असा GR काढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 05:30 AM2024-09-16T05:30:46+5:302024-09-16T05:31:24+5:30

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शिष्टमंडळाच्या बैठकीत निर्णय

Dhangar, Dhangad are the same Government will issue GR; A committee will be set up to decide the draft | धनगर समाजाच्या मागणीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल; धनगर आणि धनगड एकच असा GR काढणार

धनगर समाजाच्या मागणीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल; धनगर आणि धनगड एकच असा GR काढणार

मुंबई : धनगर आणि धनगड एकच आहेत असा स्वतंत्र जीआर राज्य सरकार लवकरच काढणार आहे. हा जीआर कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकला पाहिजे, त्यासाठी जीआरचा मसुदा तयार करण्यासाठी दोन वरिष्ठ सनदी अधिकारी आणि सखल धनगर समाजाच्या पाच प्रतिनिधींची समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती येत्या चार दिवसांत जीआरचा मसुदा तयार करेल. त्यानंतर राज्याचे महाधिवक्त्यांचे यावर मत घेतले जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

धनगर समाजाची अनुसूचित जमातीच्या समावेशाची मागणी खूप वर्षे प्रलंबित आहे. हा समावेश व्हावा यासाठी कायद्याच्या विहीत पद्धतीचा अवलंब करावा लागेल. सचिव स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आदिवासी विकाससह संबंधित अन्य

विभागांचे सचिव, समन्वय समितीच्या सदस्यांचा सहभाग घेऊन तातडीने कार्यवाहीचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल असे प्रयत्न केले जातील.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

धनगर आणि धनगड एकच आहेत असा स्वतंत्र जीआर सरकारने काढावा अशी मागणी धनगर समाजाची होती. तसा जीआर काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हा जीआर न्यायालयात टिकेल याची काळजी घेतली जाईल.

- शंभूराज देसाई, उत्पादन शुल्क मंत्री

आंदोलनकर्त्या दोन सदस्यांचा बैठकीवर बहिष्कार

पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात येऊन आंदोलकांशी चर्चा करावी, अशी मागणी शिष्टमंडळातील दोन सदस्यांनी करत बैठकीला जाणे टाळले. पुन्हा समिती स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय मान्य नाही, अशी भूमिका शिष्टमंडळातील आदित्य फत्तेपूरकर यांनी मांडली.

सोमवार, दि. १६ सप्टेंबर रोजी पंढरपुरात राज्यातील प्रमुखांच्या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे, अशी माहिती उपोषणकर्ते माउली हळणवर यांनी दिली. दरम्यान, उपोषणास बसलेले देहूगाव (जि. पुणे) येथील योगेश धरम हे चक्कर येऊन स्टेजवरच कोसळले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.  

अहवाल देण्याचे निर्देश : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या समावेशाबाबत स्थापन करण्यात आलेल्या डॉ. सुधाकर शिंदे समितीलाही लवकरात लवकर अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले.

Web Title: Dhangar, Dhangad are the same Government will issue GR; A committee will be set up to decide the draft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.