मुंबई : धनगर समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीवर यावेळी चर्चा करण्यात आली. सोबतच अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात धनगर समाजाच्या ५१ कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे मागे घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.धनगर आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली १५ संघटनांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, काकासाहेब मारकड, भाऊराव प्रभाळे आणि विविध पदाधिकारी या शिष्टमंडळात होते. त्यातील सुरेश कांबळे म्हणाले की, धनगर समाजातील ५१ पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात चौंडी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ५० कार्यकर्ते जामीनावर बाहेर असून अद्याप डॉ. इंद्रकुमार भिसे यांना तुरूंगात ठेवण्यात आले आहे. म्हणूनच भिसे यांची सुटका करून सर्व कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी ठाकरे यांना केली आहे. याशिवाय धनगर आरक्षणाचे भिजत घोंगडे तत्काळ मार्गी लावण्याचे आवाहनही उद्धव यांना केल्याचे कांबळे यांनी सांगितले.या चर्चेत धनगर आरक्षणासाठी न्याय मागणाºया कार्यकर्त्यांवरील गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्याचे आश्वासन उद्धव यांनी दिल्याचा दावा कांबळे यांनी केला आहे. तसेच सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणाचा प्रश्न सध्या न्यायालयात असल्याने त्याबाबत कोणतेही भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात उद्धव लवकरच राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कारवाईतही भेदभावलोकशाही मार्गाने जाब विचारणाºया संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांविरोधात सरकारने सूडबुद्धीने ‘शासकीय कामात व्यत्यय आणला’ आणि ‘खूनाचा प्रयत्न’ असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. संघर्ष समितीचे नेते सुरेश कांबळे यांना तर अहिल्यादेवींचे दर्शन घेण्यासाठी गेल्याबाबत आठवड्यातून दोनवेळा जामखेड पोलीस ठाण्याला हजेरी लावण्याचे आदेश आहेत. मुळात संबंधित कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम नसतानाही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आंदोलन करणाºया १५० कार्यकर्त्यांपैकी भाजपाच्या १०० कार्यकर्त्यांना सहीसलामात सोडण्यात आले. याउलट ५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करताना १६ कार्यकर्त्यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
धनगर संघटनांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, चौंडी येथील गुन्हे मागे घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:43 AM