Join us

धनगर आरक्षणासाठी याचिकाकर्ते शरद पवारांच्या भेटीला; स्वतंत्र ७ टक्के आरक्षणाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 8:16 PM

मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजालाही स्वतंत्र ७ टक्के आरक्षण देण्याची मागणी करत भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष व याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबई : मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजालाही स्वतंत्र ७ टक्के आरक्षण देण्याची मागणी करत भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष व याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली.

पाटील म्हणाले की, आदिवासी आणि धनगर समाजातील वाद टाळण्यासाठी शरद पवार यांनी सरकारदरबारी मध्यस्थी करण्याची गरज आहे. ओबीसी आणि मराठा समाजातील वाद टाळत ज्याप्रकारे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण दिले आहे, त्याप्रमाणे धनगर समाजालाही ७ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी पवारांकडे केली आहे. याशिवाय उच्च न्यायलयात सरकार वेळकाढूपणा करत असल्याने लवकरच सर्वोच्च न्यायालयाचाही दरवाजा ठोठावणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५२ टक्के आरक्षणाचा टप्पा ओलांडता येत नसले, तरी घटनेत अशी कोणतीही तरतूद नसल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. लोकसभा आणि राज्यसभेत बहुमताच्या जोरावर भाजपाला धनगर आरक्षणाचा प्रश्न सहज मार्गी लावता येऊ शकतो. मात्र इच्छाशक्तीअभावी भाजपा सरकार आरक्षणाचा प्रश्नी चालढकल करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. म्हणूनच आचारसंहिता लागण्याआधी धनगर आरक्षणावर तोडगा काढला नाही, तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :शरद पवारमुंबई