'धनुष्यबाण शिंदेंकडेच राहिल, कोर्टाचा निकालही शिंदेंच्याच बाजुने लागण्याची शक्यता'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 04:24 PM2022-08-24T16:24:37+5:302022-08-24T17:30:05+5:30
विधिमंडळात फेरफटका मारण्यासाठी आल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला
मुंबई - केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले आज मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी विधिमंडळ परिसरात भेट दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून ते राजकीय परिस्थिती आणि मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करणार होते. मात्र, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा झाली नाही. तरीही, महायुतीमध्ये रिपाइं पक्षही सोबत आहे, त्यामुळे रिपाइंला मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळावे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच, शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यातील न्यायालयीन वादावरही त्यांनी भाष्य केलं.
विधिमंडळात फेरफटका मारण्यासाठी आल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी, मुंबई महापालिकेच्या वार्डंसंदर्भात बदलेल्या निर्णयावरील विधेयकावर विधानसभेत चर्चा सुरु होती. ती चर्चा मी गॅलरीत बसून पाहत होतो, मला ती ऐकायची होती, त्यासाठी मी आलो होतो, असे रामदास आठवले यांनी म्हटले. तसेच, शिवसेनेतील बंडानंतर पडलेल्या दोन गटांचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. न्यायालयाने खंडपीठ स्थापन करण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे, यासंदर्भातील सुनावणी आणखीनच लांबली आहे.
दुसरीकडे शिंदे विरुद्ध शिवसेना यांच्यातील पक्षीय वाद हा निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. त्यामुळे, सध्या शिवसेनेला दोन्ही लढाया लढाव्या लागत आहेत. मात्र, या दोन्ही लढाया शिंदे गटच जिंकेल, कारण खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच शिवसेना असल्याचं रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. तसेच धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटालाच मिळेल असे सांगताना त्यांनी स्वत:चंच उदाहरण दिलं. आमच्या रिपाइं पक्षात काही मतभेद निर्माण झाले होते, त्यावेळी एका बाजुला मी आणि दुसऱ्या बाजुला जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई हे होते. या वादात आमचं उगवता सूर्य हे चिन्ह होतं ते गवईंना मिळालं होतं. मात्र, माझ्यासोबत १०० टक्के पक्ष होता. तरीही ते चिन्ह त्यांना मिळालं होतं. म्हणूनच, २/३ मेजोरिटी असलेल्या शिंदेंनाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल, असे आठवलेंनी सांगितलं.
आगामी नगरपालिका, महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीत असलेल्या रिपाइ पक्षाला काही जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणीही आठवलेंनी केली.
दादागिरी करुन राजकारण चालत नाही
हा उत्तर प्रदेश किंवा बिहार नाही, हे महाराष्ट्र आहे. नितीमत्तेवर येथील राजकारण चालत असते, विधानसभेत दादागिरी करुन राजकारण चालत नसतं. पायऱ्यावर दररोज बसणं योग्य नाही. जर पायऱ्यावर बसायचं असेल तर विधानसभेत येऊ नका. पायऱ्यावर बसून रस्ता अडवायचा असल्यास, इतरांची गैरसोय करता कामा नये.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा सरकार पाडा,
म्हणूनच विरोधक करतायंत राडा
अशी कविताही रामदास आठवलेंनी केली.