Join us

धारावी बनणार जागतिक ब्रँड; चर्मोद्योगास उभारी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 8:35 AM

Dharavi : धारावी पारंपरिक चर्मोद्योगासाठी ओळखली जाते. धारावी येथील चर्मोद्योग व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे.

मुंबई : धारावीतील चर्मोद्योगास पुन्हा उभारी देण्यासाठी शासनामार्फत समूह विकास योजना उभारण्याचे प्रस्तावित आहे. सदर समूह विकास योजना अंतर्गत चर्मोद्योगासाठी सामाईक सुविधा केंद्र उभारून त्या माध्यमातून चर्मोद्योगातील उपक्रमांना तांत्रिक मदत, अद्ययावत यंत्रसामग्री, वित्त पुरवठ्यामध्ये सुलभता, उत्तम दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन त्याद्वारे उद्योजकांची स्पर्धात्मकता व उत्पादन क्षमता वाढवून बाजारपेठ विकास करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे.

धारावी पारंपरिक चर्मोद्योगासाठी ओळखली जाते. धारावी येथील चर्मोद्योग व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. पायाभूत सुविधांच्या अभावासह विविध कारणांमुळे धारावीतील स्थानिक अनुसूचित जातीचे चर्मकार व्यावसायिक अस्त पावत आहेत. त्यातच मागील कोरोनाच्या कालावधीमुळे चर्मकार उद्योगाची पीछेहाट होत आहे. परिणामी लघु, मध्यम तसेच घरगुती चर्मकार व्यावसायिकांच्या मागण्या व समस्या समजून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी धारावीत विशेष दौरा केला. या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त दिनेश डोके, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, आमदार मंगेश कुडाळकर, रोहिदास समाज पंचायत संघाचे अध्यक्ष मयूर देवळेकर आदी सहभागी झाले होते.

यावेळी संबंधितांनी चर्मकार उद्योग, विक्री केंद्रांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. यावेळी उपस्थित चर्मोद्योग व्यावसायिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही उपाय देखील सुचविले. व्यावसायिकांच्या सूचना व मागण्या ऐकल्यानंतर चर्मोद्योग व चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. कच्चा माल किफायतशीर दरात उपलब्ध करण्यासाठी मुंबईलगत ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड जिल्ह्यातील शासकीय जमीन प्राप्त करून टॅनिंग उद्योगाची उभारणी करून चर्मोद्योगासाठी स्वस्तात प्रक्रिया केलेले उत्तम दर्जाचे कातडे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. 

धारावी हा जागतिक ब्रँड बनविण्याचे उद्दिष्ट शासनाने समोर ठेवले आहे. यासाठी आयुक्तालयातील पथक मंठा, जालना येथील विकसित करण्यात आलेल्या लेदर क्लस्टर बाबत देखील अभ्यास करणार आहे. या व्यतिरिक्त चर्मकार समाजाच्या इतर घटकांच्या विकासासाठी त्यांच्यातील विद्यार्थी, तरुण, तरुणांचे युवा स्वयं सहाय्यता बचत गट निर्माण करून त्यांचे प्रशिक्षण, इतर लघु उद्योगांसाठी अर्थ पुरवठा संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ व महात्मा फुले वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून साध्य करण्यात येईल. 

संत रोहिदास भवनासारखी वास्तू धारावीत उभारण्याचा मनोदयकच्चा माल किफायतशीर दरात उपलब्ध करण्यासाठी मुंबईलगत ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड जिल्ह्यातील शासकीय जमीन प्राप्त करून टॅनिंग उद्योगाची उभारणी करून चर्मोद्योगासाठी स्वस्तात प्रक्रिया केलेले उत्तम दर्जाचे कातडे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. चर्मकार समाजाच्या इतर घटकांच्या विकासासाठी त्यांच्यातील विद्यार्थी, तरुण, तरुणांचे युवा स्वयं सहाय्यता बचत गट निर्माण करून त्यांचे प्रशिक्षण, इतर लघु उद्योगांसाठी अर्थ पुरवठा विविध विकास महामंडळातून करण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई