धारावी कॅश व्हॅन लूट प्रकरणातील पसार आरोपींचा शोध सुरू
By admin | Published: March 26, 2017 03:12 AM2017-03-26T03:12:41+5:302017-03-26T03:12:41+5:30
धारावी कॅश व्हॅन लूट प्रकरणात साताऱ्यातून अटक तिघा आरोपींच्या चौकशीतून पसार ९ आरोपींचा शोध सुरू आहे
मुंबई : धारावी कॅश व्हॅन लूट प्रकरणात साताऱ्यातून अटक तिघा आरोपींच्या चौकशीतून पसार ९ आरोपींचा शोध सुरू आहे. मोबाइल लोकेशनवरून ही टोळी उत्तर, तसेच दक्षिण भारतात पळाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे.
धारावीच्या काळा किल्ला, मुकुंदनगर परिसरात असलेल्या एसबीआयच्या एटीएम सेंटरमध्ये कॅश भरण्यासाठी आलेल्या व्हॅनमधील दीड कोटीची पैशांची पेटी घेऊन ही टोळी १६ मार्च रोजी पसार झाली होती. या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. याच टोळीतील कमला उर्फ लक्ष्मी नागराज देवेंंद्र हिच्यासह आरोपी सुरेशकुमार पांडुरंगम आणि अरुमुग्म सुब्रमनी
शेखे यांना १५ लाख ४२ हजार रुपयांच्या रोख रकमेसह सातारा येथून अटक केली.
मुख्य सूत्रधार कमल रुक्माण याच्यासह नंदकुमार रुक्माण, मुकेश शेखे, मधुसुदा शेखे, भारवनन शेखे, दिनू शेखे, शंकर देवराज, शंकर अंडवर आणि आणखी एक महिला साथीदार रजनी दुराई उर्फ नेसकॉफी पेटनी अशा नऊ जणांची नावे उघड झाली आहेत. यातील रुक्माण आणि मुकेश शेखे यांच्याजवळ लुटीतील सर्वाधिक रोख रक्कम असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. त्यांचे मोबाइल लोकेशन हे उत्तर आणि दक्षिण भारतात असल्याची माहिती समोर आली. त्या दिशेने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. या प्रकरणी मुंबईतल्या काही संशयितांची धरपकड सुरू आहे. पसार आरोपींचा शोध सुरू आहे.
(प्रतिनिधी)