Join us

धारावी बेट बचाव समितीचा आर मध्य कार्यालयावर धडक मोर्चा

By मनोहर कुंभेजकर | Published: June 14, 2023 2:59 PM

येथील ग्रामस्थांना मोर्चाला जाण्यापासून रोखण्यासाठी गोराई पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले असले तरीही, गोराई जेट्टीपासून आर मध्य पालिका  विभाग कार्यालयावर हा मोर्चा आलाच.

मुंबई - बोरिवली पश्चिम येथील पालिकेच्या  आर मध्य कार्यालयावर धारावी बेट बचाव समितीच्या गोराई, मनोरी, कुलवेम, जुईपाडा आणि या भागातील अनेक आदिवासी पाड्यांतील ग्रामस्थांनी आज धडक मोर्चा काढला. येथील ग्रामस्थांना मोर्चाला जाण्यापासून रोखण्यासाठी गोराई पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले असले तरीही, गोराई जेट्टीपासून आर मध्य पालिका  विभाग कार्यालयावर हा मोर्चा आलाच.

 वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त आणि आम आदमी पार्टीच्या सदस्यांसह गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक महापालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांची भेट घेतली आणि त्यांना गावकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांची माहिती दिली.

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षा नंतर सुद्धा गोराई, मनोरी, कुलवेम, जुईपाडा आणि या भागात पिण्याचे पाणी, रुग्णालय, महाविद्यालय, प्रसूतिगृह, योग्य स्किड फ्री रस्ते अश्या विविध नागरी सुविधांचा अभाव आहे. डिसॅलिनेशन प्लांट, रो-रो जेट्टी, रोपवे, गोराई आणि मनोरी खाडीवरील पूल, इ. स्थानिकांनी मागणी केल्याशिवाय धारावी बेटावर कोणताही अवांछित विकास घडवून आणू नये अशी मागणी यावेळी आम्ही पालिका प्रशासनाकडे आम्ही केल्याची माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी लोकमतला दिली.

यावेळी लुड्स डिसूझा, नेव्हिल डिसूझा, अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा, जीना फरेरा, स्वित्सी हेन्रिक्स, मॅक्सवेल डिमेलो, दिनेश वसईकर, हिलरी मुर्झेलो आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थितहोते.

 गोराईत सक्शन टँक बांधण्याचे काम सुरू असून, ६ महिन्यांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे,गोराई जेट्टी रोडवरील वाहने घसरण्याकडे लक्ष देणे, तसेच आदिवासी पाड्यांचे प्रश्न आणि खारफुटीवर कचरा टाकणे या प्रश्नांचीही दखल घेतली जाणार असल्याचे आश्वासन असे आश्वासन सहायक आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.

यानंतर शिष्टमंडळाने उपस्थित जनसमुदायाला चर्चेत असलेल्या समस्यांची माहिती देऊन समस्या सोडविल्या नाहीत तर येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन करण्याचा धारावी बेट बचाव समितीने इशारा दिला. 

टॅग्स :मुंबईआंदोलन