Join us

धारावीत महास्वच्छता अभियान

By admin | Published: November 17, 2014 1:20 AM

देशात आणि राज्यात स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला असून, ही मोहीम प्रभावी पद्धतीने राबविण्यात येत आहे. कचरामुक्त मुंबईचा संकल्प स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचा आहे

मुंबई : मुंबई महानगर पालिकेतर्फे स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान, भारत सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान आणि डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी धारावीमधील संत रोहिदास मार्ग, ९० फूट रस्ता येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी महापौर स्नेहल आंबेकर, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आप्पासाहेब धर्माधिकारी, महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास खारगे आणि स्वच्छतेचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित होते.देशात आणि राज्यात स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला असून, ही मोहीम प्रभावी पद्धतीने राबविण्यात येत आहे. कचरामुक्त मुंबईचा संकल्प स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचा आहे आणि यासाठी या अभियानात विविध सामाजिक संस्थांना सामील करून घेण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने या अभियानात भाग घेऊन मुंबईसह देशात स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ केला आहे. दरम्यान, धारावीत महास्वच्छता अभियानांतर्गत हजारो स्वयंसेवकांनी सहभागी होत परिसर कचरामुक्त केला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी याबाबत सांगितले की, मुंबईसह इतर राज्यांतील प्रमुख शहरे या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ करण्याचा संकल्प आहे व प्रतिष्ठानचे स्वयंसेवक स्वच्छतेबाबत नागरिकांना अधिक माहितीही देणार आहेत. (प्रतिनिधी)