मुंबई : पहिल्या लाटेत धारावी हे मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, राज्य सरकार, मुंबई मनपा, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि स्थानिक जनता यांच्या एकत्रित प्रयत्नांनी धारावीने यशस्वीरित्या कोरोनावर मात केली. त्यानंतर प्लाझ्मा दानातही धारावीकरांनी पुढाकार घेतला होता. आता कोरोना लसीकरणाबाबतीतही आघाडी घेण्याच्या उद्देशाने धारावीकरांसाठी या मेगा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत ३ दिवसात सुमारे १० हजार नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण केले जाणार आहे.
१० ते १२ जुलै दरम्यान ही मोहिम राबवण्यात येत आहे. १० जुलै रोजी धारावी मेन रोड येथील जीवन हॉलमध्ये लसीकरण मोहीम राबविली गेली. ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता धारावीमधील कुंभारवाडा येथील प्रजापती हॉलमध्ये लसीकरण मोहीम राबविली गेली. दाट लोकसंख्येच्या धारावीतील लसीकरण प्रक्रियेला आणखी गती मिळावी आणि सरकारी यंत्रणांवरील भार काही प्रमाणात कमी व्हावा, या हेतूने मेगा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशन यांच्यावतीने मोफत लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
चेज द व्हायरस, मिशन झिरो, ट्रेसिंग-ट्रॅकींग-टेस्टींग-ट्रिटिंग या चतु:सूत्रीनुसार प्रयत्नांना यश येत आहे. धारावी येथे उपाययोजनांमुळे शून्य रुग्णसंख्या नोंदविण्यात येत आहे. धारावीत कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेने ज्या उपाययोजना केल्या आणि त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे त्या भागातील संसर्ग रोखण्यात यश आले, अशा या धारावी पॅटर्नची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे.